

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी एका भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि. २१) घडलेल्या या घटनेत हत्या झालेल्या नेत्याचे नाव काका अर्जून असे आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गोवर्णा यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, मृत काका अर्जून हे मूळचे बिजापूर जवळील इल्मिदी या गावचे नेते होते. नक्षलवादी गटाने सरपंच काका अर्जून यांचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध ठेवल्याचे आढळून आले. तसेच या मृतदेहावर एक पत्र देखील ठेवण्यात आलेले होते. या पत्रात दिलेल्या माहितीनुसार, वारंवार सांगून देखील राजकारणात सक्रीय झालेल्या या नेत्याचा खून करण्यात आला आहे.
या घटनेनंतर छत्तीसगडचे सचिव ओपी चौधरी म्हणाले की, या नेत्याचा खूनामागे काँग्रेसचा हात असल्याचा संशय आहे. त्यामुळे हा खून म्हणजे 'राजकीय कटकारस्थान' असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. भाजप नेत्यांना टार्गेट करण्यासाठी काँग्रेसने त्यांच्याशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, छत्तीसगड काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय सिंह ठाकूर यांनी ही हत्या अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. भाजपने या प्रकरणाचे राजकारण केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. यावेळी ते म्हणाले की, "भाजप आपल्या नेत्याच्या हत्येवर राजकारण कसे करू शकते? हे अत्यंत दुर्दैवी आहे. छत्तीसगडमध्ये रमणसिंग यांच्या कार्यकाळात नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर पसरला होता हे कसे विसरता येईल? असे सवाल ठाकूर यांनी उपस्थित केले. तसेच या घटनेबाबत शोक व्यक्त करत आणि मृत नेत्याच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत अशी प्रतिक्रिया देत चौधरी यांना प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा