

पुढारी ऑनलाईन डेस्क: कडाक्याच्या उन्हानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार वादळी पाऊस झाला. दरम्यान पुढील तीन दिवसही महाराष्ट्रातील बहुतांशी भागात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर कोकणात मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता (Weather Forecast) भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (40-50 किमी प्रतितास वेग) हलका ते माध्यम पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ पाऊस आणि गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे. तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट (Weather Forecast) येण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने एक्स पोस्ट करत दिली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासात वादळी पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दुपार/संध्याकाळपर्यंत गडगडाटी वादळासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 37°C आणि 26°C च्या आसपास राहील, असेही हवामान विभागाने (Weather Forecast) म्हटले आहे.