

: वेदगंगा नदी कोरडी पडल्यामुळे सीमाभागातील नागरिकांसह शेतकऱ्यांचा पाण्यासाठी टाहो सुरू होता. ही बातमी 'दै. पुढारी'ने गुरूवारी (दि.1) च्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारकडे पाणी सोडण्यासाठी (Maharashtra Water to Karnataka) जोर लावला होता. कर्नाटकच्या हिस्याचे चार टीएमसी पाणी दिले असताना सुद्धा काळम्मावाडी धरण प्रशासनाने दै. पुढारीच्या आवाहनानुसार माणुसकी दाखवीत आज (दि.२) सायंकाळी नानीबाई चिखली (ता.कागल) येथील धरणाच्या पाच दरवाज्यातून पुन्हा पाणी सोडल्यामुळे वेदगंगा पुन्हा दुथडी भरून वाहणार आहे. हवामान खात्याने १७ जूनपर्यंत पाऊस नसल्याचा अंदाज व्यक्त केला असल्यामुळे हे पाणी शेतकऱ्यांसह नागरिकांना वरदानच ठरणार आहे. दरम्यान पाणीटंचाईबाबत सातत्याने आवाज उठवीत पाठपुरावा सुरू ठेवल्याने 'दैनिक पुढारी'चे अभिनंदन होत आहे.
अर्थात लोकप्रतिनिधीसह पाटबंधारे विभागाने काळम्मावाडी धरण प्रशासनाकडे जरी हिस्याचे पाणी संपले असले, तरी माणुसकी म्हणून मान्सून पाऊस लांबल्याने पुन्हा एक वेळ सीमाभागाला पाणी द्या, अशी विनवणी केली होती. त्यामुळे सर्व मदार काळम्मावाडी धरण प्रशासनासह पावसावर अवलंबून होती.
सध्या शिवारात खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची सर्व ती तयारी केली आहे. शिवाय सध्या शिवारात ऊस पिकासह शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली आहेत. त्यामुळे वेदगंगा कोरडी ठाक पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. यात उष्णतेच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याने परिसरात असलेल्या विहिरीसह कुपनलिकांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात वेदगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नदी काठावरील ग्रामपंचायत अंतर्गत राबवण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाही कोरड्या टाक पडल्या आहेत. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
आंतरराज्य पाणी करारानुसार नोव्हेंबर 2022 ते 31 मे 2023 अखेर दर महिन्याला एकूण 4 टीएमसी पाण्यापैकी वर्गवारीनुसार वेदगंगेत चिखली धरणातून काळम्मावाडी धरणातून पाणी सोडले जाते. सद्यस्थितीत मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातील पाणी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात अगोदर काही दिवस पाणी सोडले होते. या पाण्याचा उपसा झाल्याने सध्या वेदगंगा कोरडी ठाक पडली आहे. त्यामुळे कोरड्या टाक पडलेल्या वेदगंगेत आणखी किती दिवसांनी पाणी येणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली होती.
या साऱ्याचा विचार करून स्थानिक लोकप्रतिनिधीसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सीमाभागाला माणुसकी म्हणून काळम्मावाडी धरण प्रशासनाकडून पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली होती. अखेर शुक्रवारी चिखली धरणाच्या एकूण दरवाज्यापैकी पाच दरवाजे उघडण्यात आले असून चार दरवाजातून 1 फुटाणे तर एका दरवाज्यातून 2.5 फुटाणे पाणी वेदगंगेत सीमाभागासाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी सिदनाळ बंधाऱ्यापर्यंत जाण्यासाठी अद्यापही चार दिवसाचा कालावधी लागणार आहे. असे असले तरी एकूणच वेदगंगेला पुन्हा पाणी आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
नदी कोरडी पडल्यामुळे आमच्या हिस्याचे पाणी मिळाले असले तरी, माणुसकीच्या नात्याने लोकप्रतिनिधीसह आम्ही काळम्मावाडी धरण प्रशासनाकडे विनंती केली होती.त्याला प्रतिसाद देत धरण प्रशासनाने शुक्रवारी वेदगंगेत पाणी सोडले असून ते जपून वापरावे लागणार आहे. अर्थात हे पाणी सिदनाळ धरणापर्यंत पूर्ण क्षमतेने थांबून राहण्यासाठी शनिवारपासून किमान सहा दिवसांसाठी उपसाबंदी लागू करण्याचे आदेश वीज मंडळाला दिले जाणार आहेत.
– बी. एस. लमाणी, पाटबंधारे अभियंता, अथणी विभाग
हेही वाचा