पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीप्रश्न दोन वर्षात संपुष्ठात

पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीप्रश्न दोन वर्षात संपुष्ठात
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत असून, तब्बल 3 लाख सदनिका तयार होत आहेत. पाण्याची गरज वाढल्याने अतिरिक्त 300 एमएलडी पाणी येत्या दोन वर्षांत दिले जाईल. सध्याचे राज्य सरकार हे गतिमान सरकार आहे. काम तातडीने पूर्ण करण्यासाठी भामा आसखेड व आंद्रा धरणापासून सुमारे 26 किलोमीटर अंतराच्या भूमिगत जलवाहिनीसाठी शासनाच्या वेगवेगळ्या 6 विभागांच्या जागांचा ताबा एका महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेस देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महापालिकेच्या विविध 23 प्रकल्प व योजनांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) झाले. प्राधिकरण, निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आ. अश्विनी जगताप, आ. आण्णा बनसोडे, आ. उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच सुनित्र माडगुळकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी ग. दि. माडगूळकर यांची चौथी पिढी सुमित माडगूळकर आणि परिवाराचा सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहराच्या शाश्वत विकासासाठी पुरेसा पाणीपुरवठा, सांडपाण्याचा पुनर्वापर व कचर्याची विल्हेवाट या तीन बाबी महत्वाच्या आहेत. त्या सुविधा प्रत्येक शहराने देणे काळाची गरज आहे. पालिकेने शहरात निर्माण होणार्या सांडपाण्याचा पुनर्वापर करावा.

ते पाणी औद्योगिक कंपन्यांनी विकत घेण्याची सक्ती केंद्राने केली आहे. औद्योगिक क्षेत्रात शेतकर्यांचे सिंचनाचे पाणी वापरता येणार नाही. प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे नद्या अधिक दूषित होत आहेत. हे थांबले पाहिजे. कचरा डेपोत अनेक वर्षांपासून जमा झालेल्या कचर्याचे डोंगर बायोमायनिंगद्वारे नष्ट करण्याचे आदेश केंद्राने सर्व महापालिकांना दिले आहेत. त्या कचर्यावर प्रक्रिया करून तो नष्ट करावा. ते काम वेगात पूर्ण केले जावे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी नवीन इमारत तसेच, मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन ते अधिक सशक्त केले जाणार आहे. अनधिकृत बांधकामांवरील शास्तीकर सरसकट माफ केला आहे. प्राधिकणातील जागा बाधितांना 12.50 टक्के परतावा देणे आणि शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेण्यात येऊन त्या कामांगा गती देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमात पालकमंत्री पाटील, खा. बारणे, आ. लांडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. आयुक्त सिंह यांनी पालिकेच्या प्रकल्पांची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे व उल्हास जगताप यांनी स्वागत केले. जितेंद्र वाघ यांनी आभार मानले.
गदिमा नाट्यगृहामुळे पिंपरी-चिंचवडची उंची वाढली

गदिमा हे आधुनिक वाल्मिकी आहेत. ते महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील अस्मरणीय स्वप्न आहे. त्याचे नाव नाट्यगृहास दिल्याने पिंपरी-चिंचवड शहराची उंची वाढली आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महापालिकेच्या तारांगणात दिवसा तारे दिसले. भविष्यातील शहर म्हणून पालिकेची अद्ययावत इमारत बांधत आहे.

भविष्यात शहराकडूनही नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. इमारत आलेल्या प्रत्येक नागरिकांचे समाधान व्हावे, अशी आत्मीयता निर्माण करा, असा सल्ला त्यांनी पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना दिला. पालकमंत्रीचंद्रकांत पाटील म्हणाले की, शहरांच्या विस्ताराप्रमाणे आवश्यक प्रकल्प हाती घेतले जातील. पाणी, रस्ते, सुरक्षा याबाबत प्रशासन आणि नागरिक यांनी जबादारी घेतली पाहिजे. पवना धरणग्रस्तांनी मध्यंतरी आंदोलन केले. त्यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, पवना नदी सुधार प्रकल्प, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प मार्गी लागले पाहिजे. अशुद्ध पाण्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पवना प्रकल्प कार्यान्वयीत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शास्तीकर संपूर्ण माफ झाला, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, प्राधिकरण हद्दीतील लहान घरांना नियमिती करण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घ्यावा. साडेबारा टक्के परताव्याबाबत निर्णय घ्यावा. पुणे ते लोणावळा या भागातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावावा, असेही ते म्हणाले.

कॉलिटी ऑफ लाईफ या हेतूने काम : आयुक्त शेखर सिंह

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, कॉलिटी ऑफ लाईफ या हेतूने एकूण 833 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकर्पण होत आहे. पाणी प्रकल्पाचे विविध प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन-तीन वर्षांत पिंपरी-चिंचवड पाण्याच्या बाबतील स्वर्यंपूर्ण होईल. शिक्षण, क्रीडा, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यावरण आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. शहरतातील मिळकतींचे सॅटेलाईट मॅपिंग होणार आहे. शहरातील क्लिनेस्ट सिटी इन इंडिया म्हणून वाटचाल करण्याचे ध्येय आहे.

फडणवीस यांचे काम दूरदृष्टीने : आ. लांडगे

आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहराच्या स्थापनेपासून पवना धरणाचा एकच स्त्रोत होता. त्यानंतर 52 वर्षांनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकाळात दुसरा स्रोत निर्माण झाला. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पामुळे शहर पाण्याबाबत आत्मनिर्भर होणार आहे. मोशीमध्ये 1972 पासून कचरा टाकला जात होता. त्यामुळे वेस्ट टू एनर्जी सारखा प्रकल्प फडणवीस यांच्याच सत्ताकाळात हाती घेतला. समाविष्ट गावांमध्ये 2017 ते 2023 मध्ये जी विकासकामे झाली, ती गेल्या 20 वर्षांत झाली नव्हती.

महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी शिंदे-फडणवीस दूरदृष्टीने काम करीत आहे. ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाला मंजुरी मी स्थायी समिती सभापती असताना दिली होती. स्थानिक नगरसेवकांनी या कामासाठी पुढाकार घेतला. त्या नाट्यगृहाचे उद्घाटन आज होत आहे, याचे विशेष समाधान वाटते. फडणवीस यांनी शास्तीकर पूर्ण माफ केला. त्याचा आनंद सर्वाधिक झाला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ 200 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल, मोशीत 850 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येत आहे. शहराचा सर्वांगीण विकास होत असताना शहरातील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये चमकावा. याकरिता कबड्डी आणि कुस्तीसारख्या पारंपरिक खेळांनाही प्रोत्साह द्यावे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news