

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मंडीच्या संशोधनाने पंजाबमधील शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अंदाधुंद वापरामुळे जाणवत असलेल्या संकटाच्या भीतीवर शिक्कामोर्तब केले आहे. हे संशोधन पंजाबच्या दक्षिण-पश्चिम भागात गेल्या दोन दशकांमध्ये भूजलाच्या गुणवत्तेत झालेली गंभीर घसरण दर्शवते. त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका वाढला आहे. त्याचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
आयआयटी मंडीने गेल्या 20 वर्षांत भूजल पातळीत झालेल्या बदलांचा व्यापक अभ्यास केला. या संशोधनाचे निष्कर्ष असे सुचवतात की, पंजाब सरकारने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी वापरल्या जाणार्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत. पाण्याच्या गुणवत्तेतील ही घसरण कृषी अवशेष आणि वाढलेल्या मानवी क्रियाकलापांमुळे झाल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. हा अभ्यास डॉ. डी. पी. शुक्ला, सहयोगी प्राध्यापक, स्कूल ऑफ सिव्हिल अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग विभाग, आयआयटी मंडी आणि पंजाबमधील पीएच.डी. विद्यार्थिनी हरसिमरनजीत कौर यांच्या सहकार्याने करण्यात आला.
2000 ते 2020 दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणार्या पाण्याची गुणवत्ता कशी बदलली, हे शोधणे हे या अभ्यासाचे उद्दिष्ट होते. यामध्ये आरोग्यासाठी धोकादायक ठरणार्या नायट्रेट आणि फ्लोराईडसारख्या हानिकारक पदार्थांच्या परिणामांची तपासणी करण्यात आली. तसेच ज्या भागात पाण्याची गुणवत्ता सर्वाधिक घसरली आहे, त्या भागांचाही अभ्यास करण्यात आला. हे संशोधन जर्नल 'एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्च'मध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण निर्धारित मानकांपेक्षा खूप जास्त असून, तेे आरोग्यासाठी घातक आहे.
दक्षिण-पश्चिम पंजाबमधील लोकांमध्ये या पाण्यामुळे किडनी स्टोन अर्थात मूतखडा होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. या पाण्यात फ्लोराईडदेखील निर्धारित मानकांपेक्षा खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे.
पंजाबमधील 315 ठिकाणांहून हे पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये फ्लोराईडचे प्रमाणही जास्त असल्याचे आढळून आले. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, पंजाबमधील 94 टक्के लोकसंख्या त्यांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी भूजलावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत हा अहवाल परिस्थितीचे गांभीर्य दाखवून या दिशेने पावले उचलण्याचा इशारा देणारा आहे.
एकेकाळी संपूर्ण देशाचे धान्याचे गोदाम म्हणून ओळखला जाणारा पंजाब हळूहळू कॅन्सरची राजधानी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही चिंतेची बाब आहे. आयआयटी मंडीच्या अहवालातील धक्कादायक खुलासेही याकडे निर्देश करतात. साहजिकच अशा परिस्थितीत, पंजाबमधील पिण्याच्या पाण्याच्या दर्जाच्या घसरणीबाबत व्यापक अभ्यासाचीही गरज भासत आहे. ईशान्य पंजाबमध्ये भूजलाची गुणवत्ता चांगली असल्याचे आढळून आले आहे. गेल्या अर्ध्या शतकात पंजाबमधील शेतीच्या पद्धतीत झालेल्या बदलामुळे पाण्याची गुणवत्ता घसरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हरित क्रांतीमुळे तांदूळ आणि गव्हाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अंदाधुंद वापर हे त्याचे प्रमुख कारण आहे. राज्यात चांगला मान्सून नसल्यामुळे सिंचनाच्या गरजा भागविण्यासाठी भूजलाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. अशा स्थितीत भूजल पातळी जसजशी खाली गेली, तसतशी त्याची खोली वाढत गेली. त्यामुळे भूजलाचा दर्जा खालावत गेला. खोल ठिकाणांहून पाण्याचे शोषण केल्यामुळे त्यात जड धातू असतात. त्यात काही किरणोत्सारी घटक असण्याचीही शक्यता आहे. निःसंशयपणे हे लोकांच्या आरोग्यासाठी एक गंभीर आव्हान आहे.