

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीमुळे सध्या अवघा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. या वारीला आता ग्लोबल स्वरूप प्राप्त झाले असून,
साता-समुद्रापारही विठू-माउलींचा जयघोष होत आहे. नेदरलँड्समध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या पालखी सोहळ्यात हरिनामाचा गजर झाला अन् तेथेही महाराष्ट्रच्या धार्मिक परंपरेचे दर्शन घडविले. नेदरलँड्समध्ये इंडियन समर फेस्टिव्हलमध्ये तेथील अल्मेरे महाराष्ट्र मंडळाने युरोपमधल्या पहिल्या दिंडीचे सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली.
आबालवृद्धांपासून दीडशेहून अधिक सदस्यांनी वारकर्यांची पारंपरिक वेषभूषा करून दिंडी व पालखी सोहळा सादर केला. या सोहळ्यात लहान मुलांनी विठ्ठल-रुक्मिणीची वेषभूषा केली होती. पारंपरिक वेशभूषा, पालखी, भक्तिमय संगीत, मृदुंग व टाळांचा खणखणाट अन् विठू-माउलींच्या जयघोषात निघालेल्या या सोहळ्याने नेदरलँडवासियांना मंत्रमुग्ध केले. रिंगणाने या दिंडीची सांगता झाली. परदेशात राहूनही मराठी संस्कृती जपण्यासाठी बिपीन पाटील (मुंबई), दीपाली पाटील (बुलडाणा), उदय परमाळे, स्वाती परमाळे (पुणे) आणि हर्षद इनामदार व कीर्ती इनामदार (कोल्हापूर) यांनी नेदरलँड्समध्ये अल्मेरे महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे. मंडळामार्फत दिवाळी, संक्रांत, गुढीपाडवा आदी मराठी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. मंडळातर्फे नियमितपणे 'ज्ञानेश्वरी'चे वाचनदेखील केले जाते. विविध मराठी उपक्रमांचे आयोजन करून या मंडळाने अल्पावधीतच नेदर्लंड्समधील नागरिेकांची मने जिंकली आहेत.
युरोपात 'स्टेज शो' दरम्यान दिंडी सोहळ्यासारखे कार्यक्रम झाले आहेत. मात्र, प्रथमच दीडशे मराठी मंडळींनी एकत्र येत आयोजित केलेला हा दिंडी सोहळा एकमेवाद्वितीय ठरला आहे. पारंपरिक पोशाख महाराष्ट्रातून मागवणे इथपासून नेदरलँड्समधील बदलते हवामान, सर्वांच्या वेळा सांभाळत सराव करणे, या सर्व अडथळ्यांवर मात करत परदेशात आयोजित केलेला हा दिंडी सोहळा निश्चितच कौतुकास्पद आहे. पांडुरंगाची कृपा व मंडळाच्या सदस्यांचा ध्यास व कष्ट यांच्या जोरावर हा सोहळा यशस्वी झाल्याचे मंडळाचे सदस्य उदय परमाळे यांनी सांगितले.
परदेशात राहूनही महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आणि भक्तिपरंपरा जपता येण्यासाठी अल्मेरे महाराष्ट्र मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळामार्फत भारतीय सण-उत्सव एकत्रितरीत्या साजरे केले जातात. आषाढी वारीची सोहळा नुकताच भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
-बिपीन पाटील, सदस्य, अल्मेरे महाराष्ट्र मंडळ, नेदरलँडदिंडी ही वारकरी परंपरा सातशे वर्षांपासून सुरू आहे. आधुनिक काळातही विठू-माउलींच्या पालखीत भक्तीचा महापूर येतो. आपण भारतात नसलो, तरी आपल्या नव्या पिढीलाही ही परंपरा कळायला हवी, यासाठीच आम्ही युरोपात दिंडी काढण्याच्या सोहळ्याचे आयोजन केले होते.
-हर्षद इनामदार, सदस्य, अल्मेरे महाराष्ट्र मंडळ, नेदरलँड