

विवेक गिरधारी
मुंबईत मराठी माणूस आज कुठे आहे? कुठे फेकला गेला? किती टक्के उरला, याचा ताळेबंद मांडता मांडता आणखी अनेक मराठी पिढ्या अस्तंगत होतील. त्यामुळे त्या हिशेबात तूर्तास जायला नको; मात्र मुंबई महापालिकेच्या मराठी कंत्राटदारांनी शिवसेनेचे आभार नक्कीच मानायला हवेत. आयकर खात्याच्या हाती लागणार्या कोणत्याही कथित डायर्यांमध्ये कधीही मराठी कंत्राटदाराची नोंद आढळणार नाही.
शिवसेनेने आपल्या संपूर्ण राजवटीत ही काळजी काटेकोरपणे घेतलेली दिसते. विसर्जित झालेल्या स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या आयकर छाप्यांमध्ये एक डायरी म्हणे आयकर पथकाच्या हाती लागली. या डायरीत ज्या अनेक नोंदी आहेत, त्यातील 'मातोश्री'ला गुढी पाडव्यासाठी 2 कोटी रुपये दिले आणि 'मातोश्री'ला 50 लाख रुपयांचे एक घड्याळ भेट दिल्याची नोंद मोठी चर्चेचा विषय ठरली. मुळात आयकर खात्याचा कारभार इतका गोपनीय असतो की, ज्याच्यावर छापा पडतो त्यालाही आयकर खात्याची आकडेमोड एखादा सीए पैसे देऊन नेमल्याशिवाय समजत नाही. पूर्वी छापे पडले इतकेच बातमीदारांना कळत असे. आता छापे सुरू असताना काय काय हाती लागले किंवा काय हाती लागले नाही, याचेही तपशील माध्यमांपर्यंत पोहोचतात.
केंद्रीय संस्थांचे हे तसे लोकशाहीकरणच म्हणायचे. लोकशाहीचे बोट धरून राजकारण शिरते तसे ते केंद्रीय संस्थांच्या कारभारातही शिरलेले असू शकते. त्याशिवाय छापे पडल्यानंतर टप्प्याटप्प्याने तपशील बातम्यांमधून पेरले जाऊ लागले आणि अंमळ पंधरा दिवसांनी यशवंत जाधव यांची डायरी बातम्यांमधूनच उगवली. अशी डायरी खरेच सापडली का? पुढे या प्रकरणाची न्याय सुसंगत तड लागली, तर या प्रश्नाचे उत्तर मिळेल. अन्यथा हा प्रश्न काळाच्या उदरात असाच गाडला जाईल. मात्र या डायरीच्या निमित्ताने यशवंत जाधव यांनी जो खुलासा केला, तो महाराष्ट्राला मातृप्रेमाचे नवे दाखले जोडणारा ठरावा. 'मातोश्री' म्हणजे माझी आई. मला दोन कोटी रुपये देणगी मिळाली. ती मी आईच्या हाती दानधर्म करण्यासाठी सुपूर्द केली, असा खुलासा जाधवांनी केला.
शिवसेनेच्या पहिल्या राजवटीत निघालेल्या 'मातोश्री' वृद्धाश्रमांचे नावही जाधव घेऊ शकले असते. परंतु, या जर्जर वृद्धाश्रमांचा शिवसेनेलाच जिथे विसर पडला तिथे त्यांची आठवण जाधवांना या संकटातही आठवण्याचे कारण नाही. 50 लाखांचे एकच घड्याळ दिल्याची कथित डायरीत नोंद आहे. ती वाचताना आयकर खात्याने केलेली व्याकरणाची चूक बहुधा जाधवांनी सुधारली. 50 लाखांचे एक नव्हे 50 लाख रुपयांची अनेक घड्याळे गुढीपाडव्यानिमित्त वाटली, असे जाधव यांचे म्हणणे आहे. डायरी मराठीत आहे म्हणजे त्यातील 'एक वचन-अनेक वचनां'चा घोळ आयकर खात्याला कळण्याची शक्यता नाही. कारण, गोष्टी बिनसल्या की, मराठी माणूस पटकन एकेरीवर येतो. या मराठी व्याकरणात न पडता आयकर खात्याने आपला मोर्चा मुंबई महापालिकेतील कंत्राटदारांचा हिशेब तपासण्याकडे वळवला. पालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना नोटीस पाठवून कंत्राटे आणि कंत्राटदारांचा तपशील आयकर खात्याने आता मागवला आहे.
खरे तर, जाधवांकडे डायरी सापडण्यापेक्षा आयकर खात्याच्या हाती कंत्राटदारांचा तपशील पडणे हे जास्त खळबळजनक ठरावे; मात्र या बातमीने मराठी कंत्राटदारांच्या मुलखात साधी प्रतिक्रियादेखील उमटलेली नाही. मराठी कंत्राटदारांनी शिवसेनेच्या राजवटीचे मनोमन आभार मानले. हे कंत्राटदार म्हणाले, 'महापालिकेत शिवसेनेची मराठी सत्ता असताना परप्रांतीय कंत्राटदारांचे साम्राज्य गेल्या पाव शतकात उभे राहिले. मराठी कंत्राटदाराला पायरीवरदेखील जागा शिवसेनेने दिली नाही. याबद्दल आता सेनेचे आभारच मानले पाहिजेत. आयकर खात्याने संपूर्ण महापालिका उचलून झटकली, तरी त्यात अडकला म्हणून एकही मराठी कंत्राटदार खाली पडणार नाही, सापडणार नाही. देशातील ही सर्वात श्रीमंत महापालिका वर्षाला 18 ते 20 हजार कोटी रुपयांची विकासकामे कंत्राटदारांच्या हाती सोपवते. याशिवाय वर्षाकाठी हाती घेतले जाणारे कोट्यवधींचे प्रकल्प वेगळे. ही सर्व कंत्राटे स्थायी समितीमध्ये मंजूर होतात. आतापर्यंतच्या नोंदी पाहता 10 ते 12 परप्रांतीय, हिंदी भाषिक तथा गुजराती कंत्राटदारांच्या पलीकडे ही कंत्राटे दिली जात नाहीत. मराठी माणूस हिशेबाला पक्का नसतो. टक्का त्याला समजत नाही.
मुंबई महापालिकेचाही तोच अनुभव असावा. त्यामुळे आयकर खात्याच्या झाडाझडतीत जे सापडतील ते सर्व परप्रांतीय कंत्राटदार असतील, याचा मराठी कंत्राटदारांना आज जो आनंद झाला, त्याला तोड नाही. यशवंत जाधवांच्या डायरीत नगरसेवकांनाही पैसे दिल्याच्या नोंदी आढळल्या. इथे मात्र मोठी सर्वपक्षीय गडबड आहे. सत्ता शिवसेनेची असली, तरी स्थायी समितीवर सर्वच पक्षांचे कमी-अधिक सदस्य असतात. त्यांच्या मंजुरीशिवाय कुठलेच कंत्राट कंत्राटदाराच्या हाती पडत नाही. कंत्राटदार जसा हिशेबाला पक्का असतो, तसा स्थायी समितीचा सभापतीही हिशेबात चोख असतो. या सचोटीतूनच यशवंत जाधवांनी नगरसेवकांना दिलेल्या पैशांची नोंद केली असेल, तर त्यातून शिवसेनेसह भाजपचे, काँग्रेसचे आणि अगदी समाजवादी पार्टीचेही नगरसेवक सुटणार नाहीत. आयकर खात्याच्या हाती अशी डायरी पडलीच असेल, तर तिचे एकेक पान निवडक माध्यमांमधून छापण्यात काय अर्थ आहे? ही संपूर्ण डायरीच जाहीर करा. मोठा माणूस आजारी पडला की, त्याच्या तब्येतीचे बुलेटिन स्वत: डॉक्टर रोज देतात. नाडीचे ठोके सांगतात, ब्लडप्रेशर सांगतात, किती अवयव सुरू आहेत, तेही ऐकवतात. मुंबई पालिकेच्या तब्येतीचेही असेच बुलेटिन आयकर खात्याने रोज जारी केले, तर ते ऐकूनच मराठी माणसाची तब्येत सुधारेल.
डायरीच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुखांच्या काळातील गुरुपौर्णिमा आठवली. शिवसेनेचे नेते गुरुदक्षिणा म्हणून शिवसेनाप्रमुखांना आपल्या ऐपतीप्रमाणे गुरुदक्षिणा देत. या नेत्यांची नावे त्यांनी दिलेल्या गुरुदक्षिणेच्या रकमेसह मुखपत्रातून रोज छापली जात. शिवसेनेत या यादीची मोठी चर्चा असायची. एखाद्या श्रीमंत नेत्याने दिलेल्या किरकोळ गुरुदक्षिणेवरून शिवसैनिक फिदीफिदी हसत, टवाळी करत. एकूणच ती निरोगी आणि खुली परंपरा होती. आज ती परंपरा राहिली नाही. मात्र, त्या परंपरेची जागा अशा डायर्यांनी घेऊ नये. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, ते योग्यच आहे, 'डायर्या लिहिण्याची पद्धत शिवसेनेत नाही!'
शिवसेनेचे नेते गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुखांना आपल्या ऐपतीप्रमाणे गुरुदक्षिणा देत. या नेत्यांची नावे त्यांनी दिलेल्या गुरुदक्षिणेच्या रकमेसह मुखपत्रातून रोज छापली जात. त्या परंपरेची जागा अशा डायर्यांनी घेऊ नये. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, ते योग्यच आहे, 'डायर्या लिहिण्याची पद्धत शिवसेनेत नाही!'