नवी दिल्ली ः जागतिक तापमानवाढीमुळे धुवीय प्रदेशांसह अन्यत्र असलेले ग्लेशियर वेगाने वितळत चालले आहेत. आता हिमालयातील बहुतांशी ग्लेशियरवरही असाच धोका निर्माण झालेला आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा फटका हिमालयाच्या क्षेत्रालाही बसला आहे. देशातील नऊ मोठे ग्लेशियर वेगवेगळ्या गतीने वितळत असल्याचे एका पाहणीतून दिसून आले आहे. गंगोत्री ग्लेशियर वर्षाला 15 मीटरने आकसत चालले असल्याचेही दिसून आले आहे.
ही पाहणी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालय जिऑलॉजी, नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी, स्पेस अॅप्लिकेशन सेंटर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्याकडून करण्यात आली. याबाबतची माहिती लोकसभेत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.
हिमालयातील नऊ ग्लेशियरची बर्फाच्या प्रमाणावर आधारित ही पाहणी करण्यात आली. तसेच हिमालयाच्या क्षेत्रातील अन्य 76 ग्लेशियरचीही पाहणी करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या भागांतील हे ग्लेशियर विविध प्रकारच्या गतीने वितळत व आकसत चालले आहेत. हिमालयाच्या हिंदुकुश भागातील ग्लेशियर वर्षाला 14.9 ते 15.1 मीटर या वेगाने, तर सिंधू नदीच्या भागातील ग्लेशियर वर्षाला 12.7 ते 13.2 मीटर, गंगेतील 15.5 ते 14.4 मीटर आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या खोर्यातील ग्लेशियर वर्षाला 20.2 ते 19.7 मीटर अशा वेगाने आकसत चालले आहेत.
हेही वाचलंत का?