सुनीताची अंतराळ मोहीम पुन्हा टळली!

सुनीताची अंतराळ मोहीम पुन्हा टळली!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अंतराळ मोहीम पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. अंतराळ यान अवकाशात झेपावणार त्याआधीच यानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोहिमेच्या तीन मिनिटांआधी ही मोहीम रद्द करावी लागली आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि त्यांचे बुच विल्मोर हे सुरक्षित आहेत.

बोईंग स्टारलाईनर प्रक्षेपणाच्या अवघ्या 3.51 सेकंदांपूर्वी बंद पडले. अवकाश यानात झेप घेण्यासाठी सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर नवीन बोईंग स्टारलाईन या अंतराळ यानात बसले होते. शनिवारी रात्री 10 वाजता अमेरिकेच्या फ्लोरिडा येथून अ‍ॅटलस व्ही रॉकेटचा वापर करून ते अंतराळयानातून गगनझेप घेणार होते. परंतु, प्रक्षेपणाच्या काही मिनिटे आधीच तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहीमही आता पुढे ढकलण्यात आली आहे. 7 मे रोजीही ही नियोजित मोहीम अपयशी ठरली होती. आता या मोहिमेच्या नव्या प्रक्षेपणासाठी जवळपास 24 तास लागतील. परंतु, नव्या मोहिमेची वेळ अद्याप जाहीर केलेली नाही.

ग्राऊंड लाँच सिक्वेन्सर आणि रॉकेटवर लक्ष ठेवणार्‍या संगणकाद्वारे तांत्रिक त्रुटी आढळून आली. अंतराळवीर आता स्टारलाईनर कॅप्सूलमधून बाहेर पडतील आणि केनेडी स्पेस सेंटरमधील क्रू क्वार्टरमध्ये परत येतील. स्टारलाईनर अंतराळयानावर सुनीता प्रशिक्षण घेत होत्या. यानाच्या विकासातील अडथळ्यांमुळे मोहीम प्रलंबित होती. जुलै 2022 मध्ये स्टारलाईनर या नव्या यानातून अंतराळवीर अवकाशात जाणार होते; मात्र कोरोनामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. 2006 आणि 2012 मध्ये त्यांनी अंतराळात प्रवास केला होता. या दोन्ही मोहिमांमध्ये एकूण 322 दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते. यावेळेस त्या तिसर्‍यांदा अंतराळात जाणार होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news