

टोरांटो : अनेक वेळा आपण रूमाल, छत्री, पेन, चावी किंवा मोबाईलही विसरत असतो. अर्थात घाईगडबडीत किंवा डोक्यात अन्य विचार असतील तर असे विस्मरण घडू शकते. छोट्या- मोठ्या विस्मरणाच्या गोष्टी फारशा गांभीर्याने घेण्यासारख्या नसतात. विशेषतः युवावस्थेत तर असे विस्मरण ही समस्या नसून ती शिकण्याचीच एक प्रक्रिया असते असे संशोधकांनी म्हटले आहे.
डबलिनच्या ट्रिनिटी कॉलेज आणि टोरांटो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ज्या गोष्टी माणूस विसरतो त्या पुन्हा आठवणीत येणार नाहीत असे नसते. मेंदू त्या गोष्टींपर्यंत पोहोचण्याचीच गरज असते. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आणि कोणती नाही, हे मेंदूच ठरवतो. काही आठवणी स्थायी रूपाने न्यूरॉन्सच्या तुकड्यांमध्ये जमा होतात. त्या सुप्त मनात साठून राहतात. त्यामुळे या गोष्टींना माणूस कधीही विसरू शकत नाही.
कोणती गोष्ट किंवा आठवण आपल्यासाठी अधिक गरजेची आहे हे मेंदू ठरवतो आणि त्याप्रमाणे आठवणींचा संग्रह करणे किंवा त्या हटवण्याचे कार्य करतो. आपण आपल्या आयुष्यात असंख्य गोष्टी मनात साठवतो; पण त्यापैकी काहींचीच आठवण राहते.