लघुग्रह बनून सूर्याभोवती फिरतोय चंद्राचा तुकडा!

लघुग्रह बनून सूर्याभोवती फिरतोय चंद्राचा तुकडा!

वॉशिंग्टन : चंद्राच्या पृष्ठभागावर लाखो वर्षांच्या काळात अनेक उल्का, लघुग्रह धडकले आहेत. त्यांच्या या धडकेमुळेच चंद्रावर अनेक खड्डे, विवरे पाहायला मिळतात. चंद्रावर वातावरण नसल्याने हे खड्डे जसेच्या तसे अजूनही कायम आहेत, ते भरून जात नाहीत. एका लघुग्रहाच्या धडकेने चंद्राचा एक तुकडा अंतराळात उडाला. आता हाच तुकडा स्वतःच एक लघुग्रह बनून सूर्याभोवती फिरत असल्याचे खगोलशास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की, चंद्रावरील एक विशिष्ट विवर एका लघुग्रहाच्या धडकेमुळे निर्माण झाले होते आणि तो लघुग्रह बाहेरून आपल्या सौरमालेत आला होता. 2016 मध्ये, शास्त्रज्ञांना सूर्याभोवती फिरणारा एक रहस्यमय खडक सापडला. त्याचा व्यास 130 ते 328 फूट दरम्यान आहे. त्या खडकाचे नाव 'कमोओलेवा' होते. आता खगोलशास्त्रज्ञ यिफेई जिओ यांच्या नेतृत्वाखालील सिंघुआ विद्यापीठाच्या संशोधन पथकाने म्हटले आहे की, लाखो वर्षांपूर्वी हा खडक चंद्राचाच भाग होता.

चंद्रावरून फुटल्यामुळे, चंद्रावर 22 किलोमीटरचे जिओर्डानो ब्रुनो क्रेटर नावाचे विवर तयार झाले. जिओर्डानो ब्रुनोचे नाव 16 व्या शतकातील इटालियन कॉस्मॉलॉजिस्टच्या नावावरून ठेवण्यात आले. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कमोलेवा नावाचा 131 ते 328 फूट रुंद लघुग्रह सुमारे 10 दशलक्ष वर्षांपूर्वी चंद्रापासून वेगळा झाला. त्यामुळे जिओर्डानो ब्रुनो विवर तयार झाले. या संशोधनाची माहिती नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. हा लघुग्रह चंद्रापासून का व कधी वेगळा झाला याची माहिती आतापर्यंत संशोधकांना नव्हती. आता नव्या संशोधनामधून हे गूढ उकलले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news