

वॉशिंग्टन : सध्या रोबोंचा वापर हरेक क्षेत्रामध्ये होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना महामारीच्या काळात तर सोशल डिस्टन्सिंगसाठी व सुरक्षेसाठी रोबोंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून आले आहे. अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि रेस्टॉरंटस्मध्येही जेवण देण्यासाठी छोट्या रोबोंचा वापर करण्यात येत आहे.
रोबो बनवणार्या कंपन्यांनी म्हटले आहे की महामारीमुळे कामगारांची कमतरता भासत आहे. तसेच 'कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी'कडे लोकांचाही कल वाढला आहे. त्यामुळे रोबोंचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला. स्टारशिप टेक्नॉलॉजीज या कंपनीने अलीकडेच वीस लाख रोबोंचे वितरण केले आहे. कंपनीचे सीईओ अॅलेस्टेअर वेस्टगार्थ यांनी सांगितले की रोबोंची मागणी आधीही होती; पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ती अधिकच वाढली.
आता रोबोंमध्ये वैविध्यही मोठ्या प्रमाणात येत आहे. कंपनी सध्या अमेरिकेतील वीस महाविद्यालयांच्या परिसरात जेवण देण्यासाठी रोबो पुरवत आहे. आणखी 25 महाविद्यालयांची यामध्ये भर पडणार आहे. किवीबॉट कंपनीचेही 400 रोबो विविध कॉलेज परिसरांमध्ये जेवण पोहोचवत आहेत. रेस्टॉरंटमध्येही वेटरचे काम करणार्या रोबोंची मागणी वाढली आहे.