मॉस्को : अमेरिकेशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता रशियाने आपला दुसरा रोबो टँक (यूजीव्ही) मॉर्कर अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल आणला आहे. हा रोबो रणगाडा माणसाच्या कोणत्याही सहाय्याशिवाय शंभर किलोमीटर अंतरापर्यंत गस्त घालू शकतो. तो आपल्यासमवेत स्वार्म ड्रोनची पूर्ण फौजच घेऊन जातो!
रशियाचे हे नवे शस्त्र क्षणार्धात शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त करू शकते. 'यूरन-9' नंतर हा रशियाचा दुसरा रोबो टँक आहे. सध्या या टँकची यूजर ट्रायल सुरू असून लवकरच हा रणगाडा रशियन सैन्यात दाखल होईल.
या मॉर्कर अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकलची निर्मिती रशियातील शस्त्र कंपनी 'फौंडेशन फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीज'ने केली आहे. या टँकमध्ये 7.62 मि.मी.ची मशिन गन लावलेली आहे. या मशिनगनच्या सहाय्याने प्रत्येक मिनिटाला शेकडो राऊंड फायरिंग केली जाऊ शकते.
याशिवाय या रोबो टँकमध्ये गायडेड अँटी टँक मिसाईलही आहेत. या टँकमधील स्वार्म ड्रोन काही मिनिटांमध्येच उड्डाण करून गुप्त माहिती गोळा करू शकतात आणि शत्रूचे तळ नष्ट करण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकतो. चेल्याबिंस्क पर्वतराजीत या रणगाड्यांची चाचणी करण्यात आली आहे.
त्यावेळी या रणगाड्याने शंभर किलोमीटर अंतर पूर्ण स्वतंत्रपणे कापले. हा रणगाडा कॅमेरे आणि अन्य सेन्सरच्या सहाय्याने आपला मार्ग स्वतःच शोधतो. तसेच वाटेतील अडथळ्यांपासूनही तो स्वतःच बचाव करतो.