

बीजिंग : जगभरात सध्या प्लास्टिक प्रदूषणाने चिंता वाढवली आहे. समुद्रातील मायक्रोप्लास्टिक साफ करण्यासाठी आता चीनच्या सिचुआन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक रोबो फिश म्हणजेच रोबो मासा बनवला आहे. हा मासा पाण्यातील प्लास्टिकचे तुकडे एका जागेतून पकडून दुसरीकडे नेऊन ठेवण्यास सक्षम आहे. अशा प्रकारे तो समुद्राची साफसफाई करू शकतो.
प्लास्टिकच्या 5 मिलिमीटर किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या तुकड्यांना 'मायक्रोप्लास्टिक' म्हटले जाते. हे तुकडे इतके छोटे असतात की, मॅग्निफाईंग ग्लासशिवाय ते दिसू शकत नाहीत. वैज्ञानिक या कणांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्लास्टिकचे हे सूक्ष्म कण पाणी, खाद्यपदार्थ आणि जमिनीवरही असतात. तेथून ते मानवी शरीरातही प्रवेश करू शकतात व त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. असे तुकडे किंवा सूक्ष्म कण गोळा करण्यासाठी आता चीनमध्ये हा रोबो फिश बनवला आहे.
त्याची लांबी 13 मिलिमीटर आहे. त्याच्या शेपटीत लेसर लाईट सिस्टीम आहे. त्याच्या मदतीने हा मासा तरंगतो आणि एका सेकंदात सुमारे 30 मिलिमीटरपर्यंत पुढे जातो. हा मासा तयार करण्यासाठी अशा सामग्रीचा वापर केला आहे, जेणेकरून तो अत्यंत लवचीक बनेल. हा रोबो फिश एकावेळी 5 किलोपर्यंतचे प्लास्टिक उचलू शकतो. त्याचबरोबर तो ऑर्गेनिक डाय, अँटी बायोटिक्स आणि हेवी मेटल असलेल्या प्लास्टिकच्या तुकड्यांनाही शोषून घेऊ शकतो. हे घटक माशाच्या सामग्रीशी क्रिया करतात.
संशोधक युयान वांग यांनी सांगितले की, हा मासा स्वतःच आपले घाव भरण्यास सक्षम आहे. काही घाव झाल्यास यामधील सामग्रीमुळे तो 89 टक्क्यांपर्यंत आपोआप भरून निघतो.