

बंगळूर : कर्नाटकमधील पश्चिम घाटात एक ठिकाण असे आहे जिथे पावसाचे पाणी एक तर अरबी समुद्राकडे जाते किंवा बंगालच्या उपसागराकडे. याच ठिकाणी ब्रिटिशांनी एक दगडी शिळाही बसवली आहे. त्यावर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराची दिशा दर्शवली आहे. कर्नाटकात सकलेशपूरजवळ हे ठिकाण आहे.
हे एक असे ठिकाण आहे जिथे पर्वत ठरवतात की, पावसाचे पाणी कोणत्या नदीतून किंवा झर्यातून कुठे जावे. बि—टिश अधिकार्यांना टोपोग्राफिकल सर्व्हे करीत असताना हे विशिष्ट ठिकाण आढळून आले. याच ठिकाणी पावसाचे पाणी विभागून ते दोन वेगवेगळ्या सागरांना जाऊन मिळते, हे त्यांच्या लक्षात आले. पश्चिमेकडे वाहत जाणारे पाणी अरबी समुद्राला मिळते, तर पूर्वेकडे वाहणारे पाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या रिज पॉईंटवरून पश्चिमेकडे जाणारे पाणी हे कुमाराधरा आणि नेत्रावती या नद्यांना जाऊन मिळते. या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पूर्वेकडे गेलेले पाणी हेमावती नदीला जाऊन मिळते व ते शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते.