मोरोक्कोमध्ये ‘सागरी दैत्या’चे जीवाश्म
लंडन : मोरोक्कोमध्ये एका विचित्र डायनासोरचे जीवाश्म सापडले आहे. हे जीवाश्म सापडल्यानंतर आता स्कॉटलंडमधील 'लॉच नेस मॉन्स्टर'च्या अस्तित्वाबाबतही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या सरोवरात लांब मानेचा एक विशालकाय प्राणी आहे असे म्हटले जाते. त्याविषयी अनेक वेळा दावे करण्यात आलेले आहेत; पण ते सिद्ध झालेले नाहीत. आता या जीवाश्माकडे पाहिल्यावर अशा स्वरूपाचे पाण्यातील किंवा 'सागरी दैत्य' म्हणता येतील असे जीव अस्तित्वात असू शकतात असे अनेकांना वाटत आहे.
या सागरी दैत्याला वैज्ञानिकांनी 'प्लेसीओसॉर' असे नाव दिले आहे. प्लेसीओसॉरबाबत सर्वात आधी सन 1823 मध्ये लोकांना समजले. त्यावेळीही उत्खननात या डायनासोरचे जीवाश्म सापडले होते. इंग्लंडच्या बाथ युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी अलीकडेच शंभर लाख वर्षांपूर्वीच्या प्लेसीओसॉरचे जीवाश्म शोधले आहे. मोरोक्कोच्या सहारा वाळवंटातील रिव्हर सिस्टीममध्ये हे जीवाश्म सापडले. लांब मान आणि तीक्ष्ण, टोकदार दात असलेले असे प्राणी पाण्यात राहत असत हे यावरून दिसून येते. बहुतांशी असे प्राणी गोड्या पाण्यात असत.
प्लेसीओसॉरलाही नेहमीच एक काल्पनिक प्राणी मानले गेले होते आणि त्याला 'नेसी' असे टोपणनावही देण्यात आले होते. मात्र, आता असे जीवाश्म आढळल्याने हे प्राणी खरोखरच अस्तित्वात होते हे दिसून आले आहे. या प्राण्यांची माशासारखी शेपूट होती, डोके लहान होते आणि मान लांबलचक होती. प्लेसीओसॉर केवळ समुद्रातच होते असे आधी समजले जात होते; पण ते गोड्या पाण्यातही राहत हे आता दिसून आले आहे.