नवी दिल्ली : बटाटा हा जगभरातील लोकांच्या आहारात असतो. कोणत्याही भाजीबरोबर गुण्यागोविंदाने ताटात नांदणारा हा बटाटा अनेक पदार्थांमध्ये वापरला जात असतो. त्यामुळे अनेक लोक बटाटे मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याची साठवणही करून ठेवतात. परिणामी, काही दिवसांनी त्यामध्ये उगवण सुरू होते, म्हणजेच बटाट्यांना मोड येण्यास सुरुवात होते. असे मोड आलेले बटाटे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरचे म्हणणे आहे की बटाट्यांना अंकुर फुटू लागले असतील तर ते खाणे टाळावे. बटाट्यामध्ये नैसर्गिकरीत्या सोलानाईन आणि चाकोनाईनसारखे काही विषारी पदार्थ असतात. अर्थात त्यांचे प्रमाण अत्यंत कमी असते व ते आरोग्यासाठी अपायकारक ठरत नाहीत.
मात्र, बटाट्याच्या वनस्पती व पानांमध्ये ते अधिक प्रमाणात असतात. बटाट्याला अंकुर फुटू लागते त्यावेळी त्यामध्ये या दोन्ही विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे असे मोड आलेले बटाटे कोणत्याही स्वरूपात खाल्ल्यानंतर ते घटक शरीरात पोहचून आपल्या शरीराला हानी पोहोचवू लागतात.
असे बटाटे एक-दोनदा खाल्ल्याने फारसे नुकसान होत नाही. मात्र, सतत अशा बटाट्याचे सेवन केले जात असेल तर अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषतः यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. उलटी, जुलाब व पोटदुखी यासारखा त्रास जाणवू लागतो. स्थिती अधिक गंभीर झाल्यास कमी रक्तदाब, ताप व डोकेदुखीही सुरू होते.