मिनी-सीपीयू नववीच्या विद्यार्थ्याने बनवला
चेन्नई : तामिळनाडूतील नववीच्या वर्गात शिकणार्या एस.एस. माधव नावाच्या एका विद्यार्थ्याने हाताच्या पंजाइतक्या आकाराचा कॉम्प्युटर सीपीयू बनवला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी त्याची भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले.
कोव्हिड महामारीमुळे शाळा बंद असल्याच्या काळात माधवने जावा, पायथन, सी. सी. प्लस प्लस आणि कोटलिनसारख्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमचे ऑनलाईन अध्ययन केले. गेल्या दोन वर्षांपासून तो तळहाताइतक्या आकाराचा सीपीयू बनवण्यासाठी डिझायनिंग आणि निर्मिती करण्याच्या कामात गुंतला होता व त्यामध्ये तो यशस्वी झाला.
माधवने सांगितले की वीसवेळा अपयश आल्यानंतर अखेर 21 व्या प्रयत्नात त्याला यामध्ये यश आले. या मिनी-सीपीयूच्या व्यावसायिक निर्मितीसाठी त्याने 'टेराबाईट इंडिया सीपीयू मॅन्युफॅक्च रिंग' नावाची कंपनीही बनवली आहे. आतापर्यंत त्याने सुमारे 15 सीपीयू बनवून त्यांची विक्रीही केली आहे.

