

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या शेजारी असलेल्या मंगळावर सध्या अनेक अंतराळयान आणि रोव्हर पोहोचलेले आहेत. या लाल ग्रहावर सध्या 'इंजिन्युटी' हे हेलिकॉप्टरही उडत आहे. एकंदरीतच मंगळ आणि त्याचा इतिहास शोधण्यासाठीचे प्रयत्न वेगाने होत आहेत.
अशावेळी एका वरिष्ठ अमेरिकन संशोधकाने दावा केला आहे की त्याने मंगळावर जीवसृष्टीचा पुरावा शोधलेला आहे. या ग्रहावर किड्यासारखी आकृती असलेला जीव शोधल्याचाही दावा त्यांनी केला आहे. अर्थातच त्यांच्या सहकारी संशोधकांना हे मान्य नाही!
'नासा'चे 97 वर्षे वयाचे संशोधक गिल्बर्ट व्ही. लेविन यांनी सांगितले की त्यांनी 45 वर्षांपूर्वी 'नासा'च्या 'वायकिंग मार्स प्रोब मिशन'मध्ये सुपरवायझर म्हणून काम केले होते. या मिशनचे नाव होते 'लेबल्ड रीलिज एक्सपिरिमेंट'. या मोहिमेत मंगळावरील मातीत सूक्ष्म जीवांद्वारे उत्सर्जित केलेल्या वायूंचा छडा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
लेविन यांनी 20 जुलै 1976 मध्येही सांगितले होते की बल्ड रीलिज टेस्टमधून आश्चर्यकारक माहिती समोर आली होती. मंगळावर जीवसृष्टीचे अस्तित्व असल्याचे पुरावे यामधून मिळाले होते. मंगळाच्या चार वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला होता व सर्व ठिकाणचे निष्कर्ष एकसारखेच होते. ते पृथ्वीवरील अशा चाचण्यांशी मिळते जुळते होते. मात्र, 'नासा' या संशोधनाने पूर्णपणे संतुष्ट नव्हती.
वायकिंग मार्स प्रोबवर लावण्यात आलेले 'वायकिंग मॉलिक्यूलर अॅनालिसिस एक्सपिरिमेंट' हे दुसरे यंत्र तिथे कोणताही जीव शोधू शकलेले नव्हते. त्यानंतर 'नासा'ने रिपोर्ट जारी करून म्हटले की मंगळावर जीवसृष्टीचे अस्तित्व नाही. मात्र, गिल्बर्ट आजही आपल्या दाव्यावर ठाम आहेत आणि आपण मृत्यूपर्यंत त्यावर ठामच राहू असे म्हणतात. त्यांनी आपले म्हणणे खरे असल्याचे सिद्ध करण्यासाठी क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळ ग्रहावर जी किड्यासारखी आकृती टिपली आहे त्याचा उल्लेख केला आहे.