

पॅरिस : फ्रान्सचे आसमंत रात्रीच्या अंधारात अचानक उजळून निघाले आणि एक जळती उल्का वेगाने कोसळत असतानाचे द़ृश्य लोकांना पाहायला मिळाले. सोमवारी पहाटेच्या वेळी उत्तर फ्रान्समध्ये ही उल्का कोसळली. ही उल्का कोसळण्याचे भाकीत आधीच सांगण्यात आलेले असल्याने अनेक लोकांनी या कोसळत्या उल्केचे व्हिडीओही बनवले.
आंतरराष्ट्रीय उल्का संघटनेने या उल्केला 'एसएआर 2667 (सीएक्स 1) असे नाव दिले आहे. संघटनेने या उल्कापाताची पुष्टी केली असून ट्विटरवर म्हटले आहे की 13 फेब्रुवारीला पहाटे 2 वाजून 59 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळी 8.29 वा.) ही उल्का कोसळली.
संघटनेने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की चंद्राजवळ अतिशय चमकदार प्रकाश दिसून आला. ही उल्का अनुमानानुसार अचूक वेळेतच कोसळली. अनेक लोकांनी ही उल्का कोसळत असतानाचे द़ृश्य पाहिले. ही उल्का एक मीटर व्यासाची होती व तिच्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नव्हता. फ्रान्सच्या रुएन येथील आसमंतात ती दिसून आली. बेल्जियम, नेदरलँड, उत्तर फ्रान्स आणि दक्षिण इंग्लंडमधूनही तिचा प्रकाश पाहण्यात आल्याचा दावा करण्यात आला.