

जोधपूर : वृद्धत्व, उपजत शारीरिक समस्या, दुर्घटना, स्ट्रोक, पोलिओ यासारख्या अनेक कारणांमुळे विकलांगता येत असते. शिथिल पडलेल्या हाता-पायासारख्या अवयवांना पुन्हा सक्रिय बनवण्यासाठी फिजिओथेरपीचा उपयोग केला जात असतो. आता भारतीय संशोधकांनी एक असा रोबोटिक प्रशिक्षक डिझाईन केला आहे ज्याचा उपयोग शरीराच्या खालील भागातील अक्षमतांवरील उपचारासाठी केल्या जाणार्या फिजिओथेरपीत होऊ शकेल. आयआयटी जोधपूरच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.
'इंटरनॅशनल जर्नल ऑफ अॅडव्हान्स्ड रोबोटिक सिस्टम्स' मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. डॉ. जयंत कुमार मोहंता व अन्य काही संशोधकांनी या रोबोटिक प्रशिक्षकाचे डिझाईन बनवले आहे. कंबरेखालील भागात विकलांगता असेल तर विशेषतः चालण्या-फिरण्याच्या स्थितीत सुधारणा होण्यासाठी बराच काळ लागतो.
कधी कधी यामध्ये एकापेक्षा अधिक फिजिओथेरपिस्टची भूमिका असते. गेल्या काही वर्षांमध्ये खालील भागातील अवयवांसाठी रोबोटिक उपकरणांचे डिझाईन बनवण्याकडे कल वाढला आहे. रोबोटिक उपचारात डॉक्टरांना केवळ उपकरण लावणे व देखरेख करणे इतकेच करावे लागते. रुग्णांच्या उपचारासाठी बहुतांश रोबोटिक प्रणालींमध्ये केवळ धनु तल (सॅजिटल प्लेन) मध्ये गतीवर आधारित कार्य केले जाते.
मात्र, प्रभावित अवयवांच्या पुनर्सक्रियतेसाठी गतीचे हे रूप पुरेशी सुविधा देण्यास सक्षम नाही, असे संशोधकांना वाटते. त्यासाठी अनुप्रस्थ (वरील व खालील शरीर) आणि कोरोनल (पुढे व मागे) गतीची आवश्यकता असते. या संशोधनात संशोधकांनी एका अशा रोबोची रूपरेखा सादर केली आहे जी तीनही प्रकारच्या पृष्ठभागावर म्हणजेच धनु, अनुप्रस्थ आणि कोरोनल प्लेनवर गती प्रदान करण्यास सक्षम असेल. शिवाय रोबो न थकता हे काम करू शकतात व त्यामुळे रुग्णावर चांगला परिणाम दिसून येऊ शकेल.