प्राण्यांमधून माणसात येणार्‍या विषाणूचा आधीच लागेल छडा

प्राण्यांमधून माणसात येणार्‍या विषाणूचा आधीच लागेल छडा

वॉशिंग्टन : कोरोना महामारीमुळे प्राण्यांमधून माणसात विषाणूंचे संक्रमण रोखण्यासाठी जगभर संशोधन केले जात आहे. आता एका संशोधनामधून स्पष्ट झाले आहे की भविष्यात प्राण्यांमधून माणसात संक्रमित होणार्‍या विषाणूची वेळीच ओळख होऊ शकते. त्यामुळे वेळीच अनेक लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात.

जगभरात हाहाकार माजवणार्‍या कोरोना विषाणूशिवाय अन्यही अनेक प्राणघातक विषाणू मूळात प्राण्यांमधूनच आलेले आहेत. अशा विषाणूंचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून वेळीच छडा लावता येऊ शकतो.

ग्लासगो युनिव्हर्सिटीतील नाईस मोलेंटेज, सायमन बाबयान आणि डॅनियल स्ट्रिकर यांनी म्हटले आहे की योग्य जेनेटिक मटेरियलसह एक विशिष्ट मशिन प्राण्यांमधून कोणता विषाणू माणसात संक्रमित होणार आहे हे आधीच दाखवू शकेल. 'पीएलओएस बायोलॉजी'मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या संशोधनानुसार सुमारे 10 लाख, 70 हजार अशा विषाणूंचा छडा लागू शकतो जे प्राण्यां मधून माणसात येऊ शकतात. एका रिपोर्टनुसार 2019 मध्ये चीनच्या वूहानमधून फैलावलेल्या कोरोना विषाणूचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशिनच्या माध्यमातून वेळीच छडा लावता आला असता. जर तसे घडले असते तर जगात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसता.

मात्र, दुर्दैवाने आतापर्यंत जगभर लाखो लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला असून अद्यापही जग कोरोनाच्या विळख्यातून मुक्त झालेले नाही! वैज्ञानिक मोलेंटेज यांनी म्हटले आहे की एखादा विषाणू केवळ एका जीनोम सिक्वेन्सनेच प्राण्यांमधून माणसात संक्रमित होऊ शकतो का, यावर अद्यापही संशोधन सुरू आहे.

ग्लासगो युनिव्हर्सिटीच्या टीमने यावर्षीच्या सुरुवातीस लिव्हरपूल युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांच्या सहकार्याने याबाबतचे संशोधन पुढे नेले आहे. विषाणूच्या झुनोटिक क्षमतेचा अंदाज त्याच्या जीनोम सिक्वेन्सने बर्‍याच अंशी लावता येऊ शकतो. मशिनच्या सहाय्याने दुर्मीळ विषाणूचाही छडा लावता येईल आणि त्यावर आधीपासूनच नजर ठेवता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news