

नवी दिल्ली : 'चंद्र' हा पृथ्वीचा प्राकृतिक उपग्रह आहे. असे असले तरी तो सध्या हळूवारपणे पृथ्वीपासून दूर जात आहे. खरोखरच चंद्र हा पृथ्वीपासून दूर अथवा सूर्यमालेतूनच बाहेर गेला तर काय होईल?
पृथ्वीपासून चंद्र हा वर्षाला दीड इंचाने दूर सरकत असल्याची पुष्टी शास्त्रज्ञांनी यापूर्वीच केली आहे. एक दिवस असा येईल की, तेव्हा हा प्राकृतिक उपग्रह पृथ्वीपासून दूर निघून जाईल आणि त्यावेळी चंद्र ग्रहणासारखी खगोलीय घटना घडणार नाही. कारण चंद्र दूर गेल्याने तो इतका लहान दिसेल की त्यामुळे तो सूर्याला झाकूच शकणार नाही.
'नासा' च्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरचे लूनार सायंटिस्ट रिचर्ड वाँड्रक यांनी 2017 मध्ये सांगितले होते की, काळानुसार पूर्ण सूर्यग्रहणांची संख्या घटत जाणार आहे. आतापासून 60 कोटी वर्षानंतर शेवटचे पूर्ण सूर्यग्रहण लागेल. कारण त्यानंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यात चंद्र येणारच नाही.
पृथ्वीपासून चंद्र दूर गेल्यानंतर रात्रीचा अंधार जास्त गडद होईल. कारण सूर्याची किरणे पडल्यातनंतरच चंद्र चमकतो आणि पृथ्वी चंद्रप्रकाशात न्हाऊन जाते. आपल्या सूर्यमालेत शुक्र हा सर्वात चमकदार ग्रह आहे; पण पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा शुक्रापेक्षा दोन हजार पटीने जास्त चमकत असतो.
चंद्रामुळे पृथ्वी आपल्या आसाने 23.5 अंशाने कलली आहे. यामुळेच पृथ्वीवरील हवामानात नियमितपणे बदल होत असतो. चंद्र दूर गेल्यानंतर हवामानात बदलाची शक्यता कमीच आहे. सुमारे 300 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या अगदी जवळ चंद्र होता. मात्र, तो सावकाशपणे पृथ्वीपासून लांब होत गेला. सध्या या दोहोंमध्ये असलेले अंतर योग्य आहे. यामुळे पृथ्वीवरील अनेक घटना नियमितपणे होत असतात. तसेच समुद्राचे सौंदर्य लाटांवर अवलंबून असते. मात्र, पृथ्वीपासून चंद्र दूर जाताच, या लाटा संपुष्टात येतील अथवा त्यांची उंची कमी झालेली असेल. यामुळे सर्फिंग खेळ संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तसेच निशाचर जीवांचे जीवनचक्रच बदलून जाणार आहे. असे अनेक परिणाम पृथ्वीपासून चंद्र गेल्यानंतर जाणवण्याची शक्यता आहे.