पिसाच्या झुकत्या मनोर्‍याचा 850 वा ‘वाढदिवस’!

पिसाच्या झुकत्या मनोर्‍याचा 850 वा ‘वाढदिवस’!
Published on
Updated on

रोम : जगातील काही प्रसिद्ध वास्तूंमध्ये इटलीतील पिसा येथे असलेल्या झुकत्या मनोर्‍याचा समावेश होतो. या मनोर्‍याने नुकताच म्हणजेच 9 ऑगस्टला आपला 850 वा 'वाढदिवस' साजरा केला. 9 ऑगस्ट 1173 मध्ये या मनोर्‍याच्या पायाचा पहिला दगड ठेवण्यात आला होता. त्याचा पायाच कमकुवत असल्याने हा मनोरा चार अंशात कललेला आहे आणि त्यामुळेच तो जगप्रसिद्धही बनलेला आहे!

हा मनोरा युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट आहे. शतकांच्या काळात या इमारतीचा पाया खाली असलेल्या मऊ मातीत खचत गेला. त्याचा परिणाम म्हणून हा मनोराही एका बाजूला झुकत गेला. मात्र, तो कोसळला नाही हे विशेष. जणू काही गुरुत्वाकर्षण शक्तीशी युद्ध करीत त्याने आपले अस्तित्व इतकी वर्षे टिकवून ठेवले आहे. हा मनोरा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. आता त्याच्या 850 व्या जन्मदिनानिमित्त शहर प्रशासनाने एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये एका प्रदर्शनाचाही समावेश होता. या प्रदर्शनात गेल्या अनेक वर्षांतील या मनोर्‍याशी संबंधित चित्रे, कलाकृती, फोटो आणि फिल्म्स ठेवल्या होत्या.

सध्या या मनोर्‍याच्या सुरक्षेसाठी सर्व उपाय केलेले आहेत. मात्र, 1990 च्या दशकात तो 4.5 अंशात झुकल्याने त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हा मनोरा मुळात एका कॅथेड्रलचा 'बेल टॉवर' म्हणून उभा करण्यात आला होता. 1993 मध्ये तो पर्यटकांसाठी बंद ठेवून सलग आठ वर्षे त्याच्या सुरक्षेसाठीचे उपाय करण्यात आले. आता त्यामुळेच आम्ही त्याचा 850 वा वाढदिवस साजरा करू शकलो असे मनोर्‍याच्या व्यवस्थापनेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. या मनोर्‍याची झुकलेल्या बाजूकडील उंची 55.86 मीटर असून दुसर्‍या बाजूकडील उंची 56.67 मीटर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news