न्यूयॉर्क : काही प्राण्यांबाबत लोकांमध्ये भलतेच गैरसमज असतात. त्यापैकी एक म्हणजे हिप्पोपोटॅमस अर्थात पाणघोड्याचे दूध गुलाबी रंगाचे असते! गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर हा समज दृढ होण्यासाठी खतपाणीच घातले गेले. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, खरोखरच पाणघोड्याचे दूध गुलाबी असते का? अर्थातच तसे काही नाही. अन्य कोणत्याही सस्तन प्राण्यांप्रमाणे पाणघोड्याचे दूधही पांढरेच असते. मग ही गुलाबी रंगाची अफवा कुठून आली? पाणघोड्याच्या शरीरातून गुलाबी रंगाचा घामासारखा स्राव निघत असतो. त्यावरून ही अफवा पसरली!
सॅन दियागो स्टेट युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापिका आणि आययूसीएन एसएससी हिप्पो स्पेशॅलिस्ट ग्रुपच्या सहअध्यक्षा रिबेका लेवीसन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, मी यापूर्वी कधीही हिप्पोंचे दूध गुलाबी असल्याचे ऐकले नव्हते. अलीकडच्या काळातच अशा अफवा पसरत आहेत. हिप्पोंचे दूध जरी गुलाबी नसले तरी त्यांचा 'घाम' मात्र गुलाबी रंगाचा असतो हे खरे आहे.
या घामासारख्या द्रव्यात जी रसायने असतात, त्यांच्यामुळे त्याला असा रंग मिळालेला असतो. खरे तर हा रूढ अर्थाने 'घाम'ही नसतो. पाणघोड्याच्या त्वचेमधून निघणारा हा एक विशिष्ट स्राव आहे. तो एखाद्या सनस्क्रीनप्रमाणे तसेच अँटीबायोटिक व अँटोमायक्रोबियल संयुगाप्रमाणे काम करतो. हिप्पोंच्या म्युकस ग्लँडस् या ग्रंथींमधून हा तेलकट पदार्थ त्वचेवर उत्सर्जित होत असतो.