परोपकारी कामांमुळे उत्सर्जित होतात आनंदाचे हार्मोन्स

परोपकारी कामांमुळे उत्सर्जित होतात आनंदाचे हार्मोन्स

लंडन : आपल्याकडे उपनिषदांमध्ये म्हटले आहे की संकुचितपणामध्ये दुःख असते आणि व्यापकपणामध्येच आनंद असतो. हे केवळ आध्यात्मिकद़ृष्ट्याच नव्हे तर सर्वच द़ृष्ट्या खरे आहे. माणूस स्वतःपुरता विचार करीत राहिला तर स्वार्थी आणि दुःखी बनतो; पण मन विशाल करून इतरांचाही विचार करू लागला तर त्याला निर्भेळ आनंद मिळतो. इतरांना मदत केल्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही सकारात्मकरीत्या होतो आणि आपल्याला आनंदही मिळतो. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, परोपकारी काम केल्याने मेंदू शरीरात आनंदाचे हार्मोन्स उत्सर्जित करतो व यामुळे माणसाला आनंदाची भावना होते.

अभ्यासादरम्यान, असे आढळून आले की दुसर्‍यांसाठी जर पैसे खर्च केले तर त्यांचा चांगला परिणाम आपल्यावर होतो. त्यासाठी केलेल्या एका प्रयोगामध्ये उच्च रक्तदाब असलेल्या लोकांचे दोन गट तयार करण्यात आले. एका गटाला स्वत:साठी जवळपास 3,000 रुपये खर्च करण्यास सांगण्यात आले. तर, दुसर्‍या गटाला इतरांच्या कल्याणासाठी खर्च करण्यास सांगितले होते. 6 आठवड्यांनंतर असे समोर आले की जे लोक इतरांवर खर्च करतात त्यांचा रक्तदाब कमी झाला होता आणि त्यांची तब्येतही चांगली होती. तर दुसर्‍या एका प्रयोगात इंग्लंडमध्ये 3 गट तयार करण्यात आले.

त्यापैकी एकाला रोज कुणाला तरी मदत करायला सांगितले, दुसर्‍याला रोज एक नवीन काम करायला सांगितलं होतं आणि तिसर्‍याला काहीच करू नका असे सांगण्यात आले होते. ज्याने इतरांना मदत केली, नवनवीन कामे केली, त्यांचा आनंद वाढला. अनाथांच्या मदतीसाठी देणगी देणार्‍या लोकांना मोठ मोठे धक्केही कमी जाणवले. छोटीशी मदतही खूप आनंद देते. साहित्याची डिलिव्हरी करणार्‍या व्यक्तीला पिण्यास पाणी देणे. कठीण काळातून जात असलेल्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्याचे ऐकणे आणि त्यांना मदत करणे. मित्राला रात्री घरी सोडल्यानेही आनंद मिळतो. अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतून इतरांना मदत करणे व्यक्तीच्या आरोग्यालाही फायदेशीर ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news