

वॉशिंग्टन : संशोधकांना पक्ष्यांचे 'ब्रेन सिग्नल्स' वाचण्यात यश मिळाले आहे. ज्या माणसांनी आपला आवाज गमावला आहे त्यांच्यासाठी पक्ष्यांवरील हे संशोधन उपयुक्त ठरू शकते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी 'झेब्रा बर्ड' या गाणार्या पक्ष्यांवर याबाबतचे संशोधन केले.
या पक्ष्याच्या मेंदूतील सिग्नल्स ओळखण्यात यश आल्याने मुक्या लोकांच्या संवादातील समस्याही दूर होण्यासाठी मदत मिळेल. याचे कारण म्हणजे दोन्ही जीवांच्या सिग्नल्समध्ये अनेक बाबतीत साधर्म्य आहे. नर झेब्रा बर्ड ज्यावेळी गात होता, त्यावेळी वैज्ञानिकांनी सिलिकॉन इम्प्लांटस्च्या मदतीने त्याच्या ब्रेन सिग्नल्सना रेकॉर्ड केले. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तो पुढे कशा पद्धतीने गाईल याचे भाकीत वर्तवले.
या तंत्राच्या सहाय्याने बोलू न शकणार्या लोकांच्या मनातील विचार ओळखता येऊ शकतील. त्यासाठी एक उपकरण तयार करून संबंधित व्यक्ती काय म्हणू इच्छिते हे समजून घेता येईल असे संशोधकांना वाटते. संशोधक डेरिल ब्राऊन यांनी सांगितले की मानवी संवादासाठीही हे तंत्र उपयुक्त ठरू शकेल.