निएंडरथल-होमो सेपियन्स मानवांचा 47 हजार वर्षांपूर्वी आला होता संबंध

निएंडरथल-होमो सेपियन्स मानवांचा 47 हजार वर्षांपूर्वी आला होता संबंध

वॉशिंग्टन : आधुनिक मानवाचा विकास हा होमो सेपियन्स या मनुष्यप्रजातीपासून झाला असे मानले जाते. मात्र, होमो सेपियन्स ही एकच मनुष्य प्रजाती अस्तित्वात होती, असे नाही. निएंडरथलसारख्या अन्यही काही मानव प्रजाती अस्तित्वात होत्या, ज्या कालौघात नामशेष झाल्या. मात्र, निएंडरथल व होमो सेपियन्स मानवामध्ये संपर्क निर्माण होऊन दोन्ही प्रजातींचा संकरही झाला होता. त्यामुळे सध्या मानवात या दोन्हीच्या खुणा आढळतात. आता संशोधकांनी म्हटले आहे की, 47 हजार वर्षांपूर्वी निएंडरथल व होमो सेपियन्स मानवांमध्ये संबंध आला आणि तो सुमारे 7 हजार वर्षे कायम होता.

प्रागैतिहासिक काळातील तसेच आधुनिक मानवातील डीएनएच्या विश्लेषणानंतर संशोधकांनी याबाबतचे निष्कर्ष काढले आहेत. त्यामध्ये असे आढळले की, आधुनिक मानवामध्ये निएंडरथलची जनुके दिसण्यास 47 हजार वर्षांपूर्वी सुरुवात झाली व ती 6800 वर्षे सुरू राहिली. निएंडरथल हे आधुनिक मानवाचे म्हणजेच होमो सेपियन्सचे सर्वात जवळचे नातेवाईक होते. दोन्ही प्रजातींचे पूर्वज सुमारे पाच लाख वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या आधुनिक मानवाशी निएंडरथल मानव प्रजातीचा संकर झाला, ही बाब दहा वर्षांपूर्वीच सिद्ध झाली होती.

सध्या आफ्रिकेबाहेरील आधुनिक मानवाच्या जीनोममध्ये 1 ते 2 टक्के निएंडरथल डीएनए आहेत. या डीएनएचा आधुनिक मानवाच्या जीनोममध्ये कधी प्रवेश झाला, हे अजूनही नेमकेपणाने सांगता येत नाही. दोन्ही प्रजातींचा संकर कुठे व कधी झाला, की वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या काळी झाला, हे स्पष्ट नाही. हे कोडे उलगडण्यासाठी संशोधकांनी गेल्या 45 हजार वर्षांच्या काळातील 300 आधुनिक मानवांच्या जीनोमचे विश्लेषण केले. त्यामधून हे नवे संशोधन करण्यात आले.

logo
Pudhari News
pudhari.news