रायपूर : छत्तीसगढमध्ये धमतरी येथे एक पानाची टपरी आहे. धरम साहू नावाच्या व्यक्तीची ही टपरी सकृतदर्शनी सर्वसामान्यच वाटते; पण या टपरीवर आपल्याला एक अनोखी गोष्ट पाहायला मिळू शकते. टपरीचे मालक धरम साहू यांना जुनी नाणी गोळा करण्याचा छंद आहे. त्यांनी 40 देशांची नाणी गोळा केली असून भारतातील मुघल व इंग्रजांच्या काळातील नाणीही त्यांच्या या संग्रहात आहेत.
तांबे, पितळ, कांसे आणि चांदीची नाणीही त्यांच्या या संग्रहात पाहायला मिळतात. टपरीवर विविध प्रकारच्या पानांचे विडे जसे मिळतात तसेच विविध देशांच्या चलनातील नाणीही त्यांच्या पोटलीत आहेत. ही पोटली त्यांनी उघडली तर टपरीवर एक मोठा खजिना उघडल्यासारखीच स्थिती असते. पानविक्रीतूनच उपजीविका चालवणार्या धरम साहू यांना नाणी गोळा करण्याचा मोठाच छंद आहे. 1983 पासून ते अशी जुनी नाणी गोळा करीत आले आहेत.
इंग्रजांच्या काळातील चांदीच्या तसेच अॅल्युमिनियमच्या नाण्यांचा त्यांच्या या संग्रहात समावेश आहे. परदेशी चलनातील काही नोटाही त्यांच्याकडे आहेत. जुन्या जमान्यातील ही चलनी नाणी नव्या पिढीला दाखवण्याच्या इच्छेमुळे आपण त्यांचा संग्रह केला असल्याचे ते सांगतात.