

वॉशिंग्टन : हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता जगभर ठळकपणे दिसत आहेत. एकीकडे युरोपमध्ये भीषण उन्हाळा आणि वणवे पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे अमेरिकेत समुद्राच्या असामान्य अशा उंच लाटा पाहायला मिळत आहेत. अमेरिकेची हवाई बेटं आणि कोना सर्फचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोन मजली इमारतीइतक्या उंच लाटा पाहून अनेक नेटकरी भयचकीत झाले!
या व्हिडीओंमध्ये समुद्राच्या लाटा दोन मजली इमारतीच्या छतांवरून येत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे आधी कोणतेही पूर्वानुमान नसताना अचानक अशा लाटा येऊ लागल्या. किनार्यालगतच्या रेस्टॉरंटमध्ये लोक खात-पीत असतानाच या लाटा उसळल्या आणि त्याबरोबरच टेबल-खुर्च्याही नष्ट होऊ लागल्या. किनार्यालगतच्या एका लग्नसमारंभालाही या लाटांचा फटका बसल्याचे व्हिडीओतून दिसून येते. काही तज्ज्ञ या घटनेला भविष्यातील आपत्तीचे संकेत मानत आहेत.
अमेरिकेची स्पेस एजन्सी 'नासा'च्या क्लायमेट चेंज रिपोर्टमध्येही म्हटले आहे की तापमानवाढीमुळे ध—ुवीय प्रदेशातील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळून समुद्राच्या पातळीत धोकादायक वाढ होऊ शकते. त्यामुळे जगभरातील किनारपट्टीलगतची शहरं समुद्र गिळंकृत करू शकतो. 2100 सालापर्यंत जगाचे तापमान बरेच वाढू शकते. त्यामुळे अनेकठिकाणचे ग्लेशियर वितळून हे पाणी मैदानी प्रदेश तसेच सागरी परिसरांमध्ये मोठी आपत्ती आणू शकते.