दै.‘पुढारी’ आयोजित संगीत मैफिलीने सातारकर बेहद खुश

दै.‘पुढारी’ आयोजित संगीत मैफिलीने सातारकर बेहद खुश
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी'च्या वतीने कस्तुरी सभासद व सातारकर नागरिकांसाठी आयोजित 'गदिमा, बाबूजी आणि मंगेशकर' संगीत मैफलीने सातारकर बेहद खुश झाले. सुमारे तीन तास शाहू कला मंदिराच्या सभागृहात अजरामर व अविस्मरणीय गाण्यांची मैफल रंगली. त्याला संगीतरसिकांनी शिट्ट्या व टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.

दै. 'पुढारी'च्या माध्यमातून वाचक व कस्तुरी सभासदांसाठी नेहमीच दर्जेदार कार्यक्रमांसह विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी शाहू कलामंदिर येथे 'गदिमा, बाबूजी आणि मंगेशकर' संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. 'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, देव देव्हार्‍यात नाही…, या सुखांनो या… पराधीन आहे पुत्र मानवाचा…' अशा भावस्पर्शी गीतांनी सातारकर रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. एकसे बढकर एक गीत सादर होऊ लागले तेव्हा आख्खं सभागृह रसिकांनी डोक्यावर घेतले.

उत्तरोत्तर एकएक गाणे पेश होत गेले अन् ही मैफल सुरांनी भारावून गेली. 'एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे… दोष ना कुणाचा.., या डोळ्यांची दोन पाखरे.., असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायाशी, डोळ्यात वाच माझ्या…' यांसह विविध एकसे बढकर एक गदिमांची अजरामर गीते गायक व वादक कलाकारांनी सादर केली. गदिमांची गीते व संगीत थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडले. प्रेक्षकांमधून शिट्ट्या व टाळ्यांची भरभरून दाद मिळाली.

'बुगडी माझी सांडली गं जाता सातार्‍याला… ऐन दुपारी यमुना तिरी… बाई मी पतंग उडवीत होते…' या गाण्यांनी तर वन्समोअर मिळवले. कार्यक्रमामध्ये डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्‍चल, जितेंद्र अभ्यंकर यांनी गायन केले. त्यांना प्रसन्न बाम, अमेय ठाकूरदेसाई, सिध्दार्थ कदम, झंकार कानडे, प्रणव हरिदास यांनी साथ दिली. आनंद माडगूळकर यांचा या मैफलीत विशेष सहभाग राहिला. मनीष आपटे यांच्या सूत्रसंचलनाने मैफिलीची रंगत वाढवली.

प्रारंभी दै.'पुढारी'चे वृत्तसंपादक हरिष पाटणे यांनी कस्तुरी क्‍लबच्या वाटचालीचा आढावा घेतला. कलावृंदाचे स्वागत दै. 'पुढारी'चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, हरिष पाटणे, जाहिरात विभागप्रमुख मिलींद भेडसगावकर यांनी केले.

कस्तुरी सभासद नोंदणी लवकरच होणार सुरू

दै.'पुढारी' कस्तुरी क्‍लबच्या सभासद नोंदणीला लवकरच सुरूवात होणार आहे. सभासद होणार्‍या महिलांना आकर्षक भेटवस्तू मिळणार असून वर्षभर बक्षिसांचा वर्षावही होणार आहे. सभासद नोंदणीसाठी दै.'पुढारी' कार्यालयात 11 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत 8104322958 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news