दात पुन्हा उगवण्यासाठी बनले औषध; सप्टेंबरपासून मानवावर होणार चाचण्या

दात पुन्हा उगवण्यासाठी बनले औषध; सप्टेंबरपासून मानवावर होणार चाचण्या

टोकियो : दुधाचे दात पडले की नवे दात उगवून येत असतात. मात्र, हे मोठेपणीचे दात पडले की पुन्हा दात येत नाहीत. अशावेळी कृत्रिम दातांचा आधार घ्यावा लागत असतो. वृद्धावस्थेत तर अनेकजण कवळी लावत असतात. आता यावर जपानी वैज्ञानिकांनी एक आशादायक संशोधन केले आहे. त्यांनी एक असे औषध विकसित केल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे दात पुन्हा नव्याने उगवून येऊ शकतील! या औषधाच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून, आता सप्टेंबरपासून मानवावर चाचण्या सुरू होतील.

हे औषध 2030 पर्यंत बाजारात आणण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. जपानच्या क्योटो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 या काळात मानवावर या औषधाच्या चाचण्या होतील. त्यामध्ये 30 ते 64 वर्षे वयोगटातील 30 पुरुषांना सहभागी करून घेण्यात आले आहे. या पुरुषांमध्ये किमान एक दाढ तरी पडलेली आहे. त्यांच्यावर 'इंट्राव्हेनस ट्रिटमेंट' म्हणजेच 'अंतःशिरा उपचार' करण्याच्या या नव्या पद्धतीचे परीक्षण केले जाईल. फेरेट आणि माऊस मॉडेलमध्ये कोणत्याही दुष्परिणामाशिवाय नवे दात उगवले गेल्यानंतर आता या मानवी चाचण्या सुरू होतील. किटानो हॉस्पिटलमध्ये दंत चिकित्सा आणि मौखिक शस्त्रक्रियेचे प्रमुख तसेच या संशोधनाचे प्रमुख संशोधक कात्सु ताकाहाशी यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ज्या लोकांची दातांची हानी झाली आहे किंवा दात नसल्याने त्रस्त आहेत, अशा लोकांना मदत करण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी हे संशोधन करण्यात येत आहे. चाचणीत अकरा महिन्यांच्या पहिल्या टप्प्यानंतर संशोधक दोन ते सात वर्षे वयोगटातील बालकांवरही याचे परीक्षण करतील. ही मुले अशी असतील ज्यांच्यामध्ये दातांबाबत जन्मजात दोष असल्याने किमान चार दात गायब आहेत. अशी समस्या एक टक्का लोकांमध्ये असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news