

न्यूयॉर्क : तब्बल दहा लाख वर्षांपूर्वीच्या सूक्ष्म जीवाच्या डीएनए नमुन्याचा वैज्ञानिकांनी अंटार्क्टिक महासागराच्या तळाशी शोध लावला आहे. दक्षिण ध्रुवावरील या महासागरात सापडलेले हे डीएनए समुद्रतळाशी आढळलेले सर्वात जुने डीएनए ठरले आहे.
संशोधकांना हे नमुने अपघातानेच गवसले. त्यांना 'सेडीमेंटरी एन्शन्ट डीएनए' किंवा 'सेडा डीएनए' या नावाने ओळखले जाते. समुद्रतळाशी 584 फूट खोलीवर हे जनुकीय नमुने सापडले. अंटार्क्टिका म्हणजेच दक्षिण ध्रुवाच्या उत्तरेला असलेल्या स्कॉटिया सी या समुद्रातील 'इंटरनॅशनल ओशन डिस्कव्हरी प्रोग्रॅम'मध्ये हे संशोधन झाले.
'नेचर कम्युनिकेशन्स' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या सेडाडीएनएचे संशोधकांनी प्रथमच विश्लेषण केले आहे. या डीएनए फ्रॅग्मेंटस्मधील क्षतिग्रस्त झालेल्या पॅटर्नचाही अभ्यास करण्यात आला व त्यावरून हे नमुने नेमके किती वर्षे जुने आहेत हे शोधून काढण्यात आले. त्यापैकी सर्वात जुने फ्रॅग्मेंट हे तब्बल दहा लाख वर्षांपूर्वीचे असल्याचे दिसून आले. यापूर्वी आर्क्टिक म्हणजेच उत्तर ध्रुवावर आढळलेले सर्वात जुने डीएनए 6,50,000 वर्षांपूर्वीचे होते.