दहा लाख वर्षांपूर्वी चीनमध्ये होता महाकाय चित्ता

दहा लाख वर्षांपूर्वी चीनमध्ये होता महाकाय चित्ता

बीजिंग : संशोधकांनी आता जगातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आकाराच्या चित्ता प्रजातीचा शोध घेतला आहे. तब्बल दहा लाख वर्षांपूर्वी, सध्याच्या चीनच्या भूमीत वावरणार्‍या या चित्त्याचे जीवाश्म सापडले आहेत. त्यामध्ये त्याच्या कवटीचा समावेश आहे. त्याच्या अभ्यासावरून एकेकाळी चित्त्याची ही महाकाय प्रजाती पृथ्वीवर अस्तित्वात होती हे दिसून आले. ते सध्याच्या चित्त्यांपेक्षा तिप्पट मोठे व वजनदार होते!

या प्रजातीला 'एसिनोनिक्स प्लिस्टोकेनिकस' असे वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. हे चित्ते केवळ चीनमध्येच नव्हे, तर संपूर्ण युरेशियात 1.3 दशलक्ष ते पाच लाख वर्षांपूर्वीच्या काळात वावरत होते. उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतात 1925 मध्ये त्याच्या खालच्या जबड्याचे हाड सापडले होते. त्यावेळेपासूनच या प्रजातीबाबत संशोधन सुरू होते. आता यावर नवे संशोधन झाले असून, त्याच्या कवटीच्या लांबीवरून तसेच त्याच्या दाताची उंची, कवटी तसेच मणक्याला जोडणार्‍या हाडांची रचना व रुंदी यांचा अभ्यास करून त्याचा आकार व वजन याबाबतचा अंदाज काढण्यात आला आहे.

संशोधकांना आढळले की, हे चित्ते 130 किलोपेक्षाही अधिक वजनाचे होते. ते 190 किलो वजनापर्यंतचेही असू शकतात. सध्याच्या वाघ किंवा सिंहांइतके हे वजन आहे. सध्याच्या काळातील आफ्रिकन चित्त्यांचे वजन 34 ते 64 किलो इतके असते. 2021 मध्ये या प्राचीन चित्त्याच्या वरच्या जबड्याचेही हाड चीनमध्ये सापडले होते. त्याचाही अभ्यासासाठी वापर करण्यात आला. पाच लाख वर्षांपूर्वीच्या काळात ही प्रजाती नष्ट झाली. हवामान बदलामुळे झालेल्या विपरीत परिस्थितीने या प्रजातीचा बळी घेतला, असे संशोधकांना वाटते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news