वॉशिंग्टन : सध्याचा जमाना नॅनो टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि थ्री-डी प्रिंटिंगचा आहे. थ्री-डी प्रिंटिंगच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीचा हुबेहूब पुतळा बनवण्यापासून ते चक्क घराची उभारणी करण्यापर्यंतही अनेक गोष्टी करता येऊ शकतात. आता अमेरिकेतील 'झिंगर व्हेईकल्स' या कंपनीनेथ्री-डी प्रिंटिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने एक हायब्रीड स्पोर्टस् कार तयार केली आहे. या कारचे नाव आहे 'झिंगर 21 सी'.
ही सुपरकार 'इथेनॉल इ-85'वर चालते आणि तिचे हायब्रीड इंजिन 1250 अश्वशक्तीचे उत्पादन करते. या कारला शुन्यापासून ताशी 100 किलोमीटरचा वेग घेण्यासाठी अवघे 1.9 सेकंद लागतात. या कारचे पहिले वितरण 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे. कारची किंमत तब्बल 15.26 कोटी रुपये आहे. सध्या अशा 80 मोटारी बनवण्याचे काम सुरू आहे. या कारची निर्मिती लॉस एंजिल्समध्ये होत आहे. केव्हिन झिंगर यांची ही कंपनी असून या कारचे 2020 च्या जिनिव्हा मोटार शोमध्येच सादरीकरण केले जाणार होते. मात्र, कोरोना महामारीमुळे हा शो रद्द करण्यात आला होता. त्यामुळे लंडनमध्ये 11 मार्च 2020 रोजी ही कार सर्वप्रथम लोकांसमोर आणण्यात आली होती. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे तिची ड्रायव्हर सीट कारच्या मध्यभागी आहे.