तुर्कीमध्ये सापडला दोन हजार वर्षांपूर्वीचा मकबरा

तुर्कीमध्ये सापडला दोन हजार वर्षांपूर्वीचा मकबरा

अंकारा : तुर्कीच्या पुरातत्त्व संशोधकांनी प्राचीन थारसा शहरात केलेल्या उत्खननात दोन हजार वर्षांपूर्वीचा मकबरा शोधून काढला आहे. या मकबर्‍याच्या प्रवेशद्वारावर दोन बैलांच्या प्रतिमा आहेत. हा मकबरा अद्यामन-सानलीउरफा राज्यमार्गावरील कुयुलू गावाजवळ आहे. त्याला आता टुरुस रॉक टॉम्ब्स म्हणून ओळखले जात आहे. येथील मकबरे रोमन काळातील आहेत.

येथील कबरींना जमिनीच्या खाली शिळा कोरून बनवण्यात आले आहे. खाली उतरण्यासाठी दहा ते तेरा पायर्‍या असतात. या कबरींच्या भिंती व दरवाजांवर वेगवेगळ्या आकृत्या व मजकूर कोरलेला आहे. थारसा हे एक प्राचीन शहर असून, तिथे अशा 60 कबरी आहेत. या शहरात सतत नवनवे पुरातत्त्वीय शोध लागत असतात. नेक्रोपोलिस क्षेत्रात याच वर्षी उत्खनन सुरू करण्यात आले होते. आता नुकतेच टीमने दोन अतिरिक्त शिळा थडग्यांचा शोध लावला आहे.

वाईट शक्तींपासून मृत व्यक्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी अशा मकबर्‍यांच्या दरवाजावर दोन बाजूस बैलांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. बैल हे तेथील प्राचीन समुदायात गुरूचे तसेच शक्तीचे प्रतीक होते. बैल हा अथेन्स शहराचेही प्रतीक होता. रोमन नाण्यांवर बैलाची प्रतिमा ताकद आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक म्हणून वापरली जात असे. गुरू, मंगळ अशा ग्रहांचे प्रतीक म्हणूनही त्याचा वापर होत असे. रोमन आणि बेझांटिन काळातील मकबर्‍यांवर अशा बैलाच्या प्रतिमा आढळतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news