न्यूयॉर्क : मेंदू, हृदय, फुफ्फुसं, मूत्रपिंड आणि यकृत ही शरीरांतर्गत असलेले पाच असे अवयव आहेत, ज्यामधील एकाचेही काम बंद पडले तरी मृत्यू ओढवतो. मानवला बुद्धीचे वरदान ज्या मेंदूच्या माध्यमातून मिळाले आहे तो शरीरातील अत्यंत जटील यंत्रणेची चोख व्यवस्था ठेवत असतो. अलीकडेच मानवी मेंदूबाबत एक नवे संशोधन झाले आहे. त्यानुसार तीन हजार वर्षांपूर्वी मानवी मेंदू आकसला होता.
मेंदूच्या आकारात कशाप्रकारे वाढ किंवा घट होऊ शकते हे पाहण्यासाठी मुंग्यांवर संशोधन करण्यात आले. संशोधकांनी म्हटले आहे की आपल्या विकासक्रमाच्या इतिहासात मानवी मेंदूच्या आकारात वाढ झाली होती. मात्र, प्लिस्टोसिन काळानंतर मानवी मेंदूचा आकार कमीही होऊ लागला. हे परिवर्तन नेमके कधी व का सुरू झाले हे समजलेले नाही.
डार्टमाऊथ कॉलेजचे संशोधक डॉ. जेरेमी डिसिल्वा यांनी सांगितले की आपला मेंदू प्लिस्टोसिन काळातील पूर्वजांच्या तुलनेत छोटा आहे हे एक आश्चर्यकारक असे सत्य आहे. या संशोधनासाठी 985 जीवांचे अवशेष आणि आधुनिक 'ह्यूमन क्रॅनिया'च्या डेटासेटमधील परिवर्तन बिंदूनुसार अभ्यास करण्यात आला. त्यामधून असे दिसून आले की प्लिस्टोसिनच्या काळात मानवी मेंदूचा आकार 2.1 दशलक्ष वर्षांपूर्वी वाढत होता. मात्र, सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी त्याच्या आकारात घट झाली.