ओटावा : जीवाश्म वैज्ञानिकांनी 50 कोटी वर्षांपूर्वीच्या एका जीवाच्या मेंदूचे जीवाश्म शोधले होते व त्यावर आता महत्त्वपूर्ण संशोधन झाले आहे. हा मेंदू तीन डोळ्यांच्या प्राण्याचा असून तो समुद्रात राहत असे. या शोधामुळे कीटक व कोळ्यांच्या उत्क्रांतीला समजून घेणे अधिक सोपे होणार आहे. या जीवाचे नाव आहे 'स्टेनलीकारिस हिरपेक्स'. त्याचे दोन डोळे सामान्य जीवांसारखेच होते व दोन्ही डोळ्यांच्या दरम्यान आणखी एक डोळा होता.
या जीवाचा चेहरा पुढील बाजूने गोल व दात असलेला होता. 50 कोटी वर्षांपूर्वीच्या या जलचराने वेगाने आपला विकास घडवला होता. हे जीव कँबि—यन एक्सपोलजनच्या काळात पृथ्वीवर अस्तित्वात होते. हाच तो काळ आहे ज्यावेळी बहुतांश जीवांचे जीवाश्म बनले होते. हा जीव ऑर्थोपोडाच्या रेडियोडोंटा नावाच्या प्रजातीशी संबंधित होता, जे आधुनिक किडे व कोळ्यांचा दूरचा नातेवाईक आहे.
स्टेनलीकारिस विचित्र असला तरी त्याच्या मेंदूबाबत संशोधकांना कुतूहल आहे. संशोधकांनी 50 कोटी वर्षांपूर्वीच्या सुमारे 250 पेक्षाही अधिक जीवाश्मांच्या नमुन्यांचे अध्ययन केले आहे ज्यापैकी 84 मध्ये मेंदू आणि मध्यवर्ती चेतासंस्था सुस्थितीत आढळली.
स्टेनलीकारिस हिरपेक्सचा मेंदू दोन खंडांनी बनला होता. सध्याच्या किड्यांमध्ये तो तीन खंडांचा असतो. ऑर्थोपोडचा मेंदू, त्याची द़ृष्टी आणि डोक्याच्या संरचनेवर या संशोधनाने नवा प्रकाश पडू शकतो. स्टेनलीकारिसच्या जीवाश्माला कॅनडाच्या बि—टिश कोलंबियामधील बर्गेस शेलमध्ये 1980-90 च्या दशकात शोधण्यात आले होते.