तैपेई सिटी : जगभरात अनेक प्रकारची जनावरे पाळली जातात. काहींना कुत्री, मांजरे, तर काहींना पक्षी पाळण्याचाही शौक असतो. मात्र, एका तरुणीने अत्यंत हिंस्र समजल्या जाणार्या मगरींना पाळले आहे. तिने आपल्या घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा मगरी पाळल्या आहेत. या मगरींना ही तरुणी अगदी मांजर, कुत्र्यासारखे हाताळत असते.
तैवानमध्ये राहणारी साशिमी आपल्या घरात कसलाच अडथळा नसल्याने मगरींना मोकळेपणाने फिरण्याची मुभा देते. सर्वप्रथम तिने तैवानमधील एका ब्रिडरकडून एक मगर खरेदी केले. त्यानंतर आवड वाढली आणि मगरींची संख्याही वाढत गेली. कधीही प्राणावर बेतू शकते, हे माहीत असतानाही साशिमा या मगरींना पोटच्या पोरांसारखे पाळते. मात्र, आजपर्यंत एकाही मगरीने आगळीक केलेली नाही, हे विशेष!
सहा मगरींमधील साशिमाच्या आवडत्या मगरीचे नाव 'फिल' असे आहे. ही मगर साशिमाचे साहित्य तोंडात धरून घरभर फिरत असते, तर कधी हेच साहित्य लपवूनही ठेवते. हे साहित्य तोंडात धरून फिल सोफ्याखाली लपते. मात्र, पकडली गेल्यानंतर घरभर पळू लागते. कधी कधी फिलच्या तोंडाला एखादे खेळणे लागले आणि ते काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास तिला राग अनावर होतो. मात्र, लटका राग दाखवत ते खेळणे तितक्याच प्रेमाने परतही करते.
साशिमाने या पाळीव पण हिंस्त्र मगरींसाठी एक शानदार बेडरूमही तयार करवून घेतली आहे. यामध्ये गाद्या, उशा असाही सर्व काही थाट आहे. यावर या मगरी निवांत झोप घेतात. त्यांच्यासोबत साशिमा नेहमीच मस्ती करत असते.