ढाका ः जगातील सर्वात बुटकी गाय !

जगातील सर्वात लहान गाय
जगातील सर्वात लहान गाय

ढाका ः बांगलादेशात सध्या एक गाय प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ही जगातील सर्वात बुटकी गाय आहे. या गायीची उंची अवघी 51 सेंटीमीटर म्हणजेच वीस इंच असून वजन 28 किलो आहे. राणी नावाची ही गाय 23 महिन्यांची असून ती बकरीपेक्षाही लहान आकाराची आहे. ही गाय तिकडे इतकी प्रसिद्ध झाली आहे की तिला पाहण्यासाठी लॉकडाऊनच्या काळातही सुमारे 15 हजार लोक येऊन गेले आहेत!

या गायीच्या मालकाचे नाव आहे हसन हॉलादर. बांगलादेशची राजधानी ढाकाजवळील चारीग्राम येथे त्यांचे शेत आहे. तिथे असणार्‍या या गायीची नोंद गिनिज बुकमध्ये व्हावी यासाठी अर्ज पाठवण्यात आला आहे. सध्या जगातील सर्वात बुटकी गाय म्हणून केरळच्या माणिक्यम या गायीची नोंद गिनिज बुकमध्ये आहे. 2014 मध्ये माणिक्यमची उंची 24 इंच होती. आता राणीची नोंद गिनिजमध्ये व्हावी यासाठी हसन प्रयत्नशील असून त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी घेण्यात आला आहे. या गायीबद्दल हसन यांनी सांगितले की तिला नीट चालता येत नाही. तसेच ती अन्य मोठ्या गायींना घाबरते, त्यामुळे तिला त्यांच्यापासून दूर ठेवले जाते. राणी दिवसातून दोन वेळेलाच थोडे थोडे खाते. तिला कुणीतरी हातात घेऊन फिरवणे आवडते. या गायीला कोणत्याही परिस्थितीत विकण्याची आपली इच्छा नसल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news