जुन्या गाडीतून 102 देशांचा प्रवास

जुन्या गाडीतून 102 देशांचा प्रवास

Published on

ब्यूनस आयर्स :  पाश्‍चिमात्य देशांमधील अनेकांना प्रवासाची आवड असते. अनेकजण जुन्या गाड्या किंवा नौकेमधूनही जगाचा प्रवास करीत असतात. असेच एक कुटुंब अर्जेंटिनाचे आहे. हर्मन आणि कॅडेलारिया नावाच्या दाम्पत्याने 25 जानेवारी 2000 मध्ये अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समधून 1928 चे मॉडेल असलेल्या एका जुन्या गाडीतून जगाचा प्रवास सुरू केला. आता 22 वर्षांच्या काळात दोघांनी 102 देशांचा प्रवास केला आहे. या प्रवासातच त्यांनी आपल्या चार अपत्यांनाही जन्म दिला.

त्यांच्या या गाडीचे नाव 'ग्रॅहम पॅगे' असे आहे. दोघांनी ज्यावेळी प्रवास सुरू केला त्यावेळी स्मार्टफोन नव्हते आणि इंटरनेटही धीमे व महागडे असायचे. जुनी गाडी असल्याने तिच्यामध्ये अनेक वेळा बिघाड निर्माण होत असे. तरीही दोघांनी आपली आनंदयात्रा सुरूच ठेवली. या प्रवासात त्यांनी अनेक अनुभव घेतले. आशियात बदकाची अंडी खाल्‍ली, नामिबियात स्थानिक लोकांसमवेत नृत्य केले, सातपेक्षा अधिकवेळा समुद्रही पार केला. इतकेच नव्हे तर त्यांनी जगातील सर्वात उंच पर्वतशिखर असलेल्या एव्हरेस्टची चढणही (अर्थातच गाडीशिवाय) चढली!

इजिप्‍तमध्ये तुतानखामेनच्या मकबर्‍यातही प्रवेश करण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्या 22 वर्षांच्या प्रवासात त्यांनी आठवेळा टायर बदलले आणि दोनवेळा इंजिनची दुरुस्ती केली. त्यांनी प्रवास सुरू केला त्यावेळी हर्मन 31 वर्षांचे होते जे आता 53 वर्षांचे झाले आहेत तर त्यांची पत्नी कँडेलारिया प्रवासाच्या प्रारंभी 29 वर्षांच्या होत्या ज्या आता 51 वर्षांच्या झाल्या आहेत. हे पती-पत्नीच प्रवासाला निघाले होते आणि आता त्यांचा सहा सदस्यांचा परिवार आहे. त्यामध्ये त्यांची चार मुलं आणि एक कुत्रा व एक मांजर यांचा समावेश आहे. 19 वर्षांच्या पम्पाचा जन्म अमेरिकेत, सोळा वर्षांच्या तेहुआचा जन्म अर्जेंटिनात, चौदा वर्षांची पालोमाचा जन्म कॅनडात तर बारा वर्षांच्या वालाबीचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला.

रस्त्यावरून प्रवास करीत असतानाच या दाम्पत्याने चारही मुलांचे पालन-पोषण केले. या काळात त्यांनी क्राऊडफंडिंग साईटस्च्या माध्यमातून पैसे कमावले. अनेक बाबतीत ते अनोळखी माणसांच्या मदतीवरच अवलंबून होते. आता त्यांचा हा दीर्घ प्रवास संपला असून हा प्रवास अवर्णनीय होता असे त्यांनी म्हटले आहे. जगात मानवता आहे, चांगली माणसं आहेत, हेच आम्हाला या प्रवासातून समजले, असे कँडेलारिया यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news