वॉशिंग्टन : खगोल शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की अधिक जुने लघुग्रह हे तुलनेने अधिक कठीण आहेत. त्यांना नष्ट करणे हे आधीच्या अनुमानापेक्षा अधिक अवघड बाब आहे. हे लघुग्रह एखाद्या शेंगदाण्याच्या किंवा उशीच्या आकाराचे असतात. अशा लघुग्रहांवर काही सोडले तर ते 'बाऊन्स' होण्याचीच शक्यता अधिक!
अशाच एका लघुग्रहाला 'इतोकावा' असे नाव देण्यात आले आहे. हा लघुग्रह 1640 फूट म्हणजेच 500 मीटर लांबीचा आहे. गेल्या 4.2 अब्ज वर्षांच्या काळात या लघुग्रहाची अनेक वेळा अन्य खगोलांशी धडक झाली आहे; पण तरीही तो तग धरून राहिलेला आहे. अशा प्रकारचे लघुग्रहही पृथ्वीच्या दिशेने येऊ शकतात आणि त्यांना नष्ट करणे किंवा त्यांची दिशा बदलणे हे सहजसोपे काम असणार नाही.
जुन्या काळातील मोठ्या धडकेतून जी धूळ व खडक अवकाशात उडाले ते गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे एकत्र येऊन असे लघुग्रह बनलेले आहेत. त्यांच्यापैकी बहुतांश लघुग्रहांच्या अंतर्गत भागात पोकळी असल्याने ते 'शॉक ऑब्सॅर्बर' बनलेले आहेत. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस' या नियतकालिकात देण्यात आली आहे. हे लघुग्रह अत्यंत जुने म्हणजेच जवळजवळ आपल्या सौरमालिकेच्या निर्मितीच्या काळापासूनचे आहेत.
जपानी अंतराळ संशोधन संस्थेच्या 'हायाबुसा-1' मोहिमेत अशाच 4.5 अब्ज वर्षांपूर्वी बनलेल्या 'इतोकावा' लघुग्रहावरील धुळीचे नमुने गोळा करण्यात आले होते. हे यान 6 अब्ज किलोमीटरचा प्रवास करून 2010 मध्ये पृथ्वीवर परतले होते.