चीनमध्ये 2400 वर्षांपूर्वीचे ‘फ्लश टॉयलेट’!
बीजिंग : रेशमापासून कागदापर्यंत अनेक गोष्टींचा शोध सर्वप्रथमच प्राचीन चीनमध्येच लागला हे आपल्याला माहिती आहे. मात्र, जगातील सर्वात जुने 'फ्लश टॉयलेट'ही चीनमध्येच सापडेल याची कुणी कल्पना केली नसेल. चीनच्या पुरातत्त्व संशोधकांनी आता जगातील सर्वात जुन्या फ्लश टॉयलेटस्पैकी एक असलेल्या शौचकुपाचा तिथे शोध लावला आहे. हे शौचकूप 2200 ते 2400 वर्षांपूर्वीचे आहे. त्यामध्ये एक बाऊल आणि बाहेरच्या बाजूस असलेल्या खड्ड्याकडे मैला वाहून नेणार्या पाईपचा समावेश आहे.
युयांग शहराच्या प्राचीन अवशेषांमध्येच असलेल्या एका महालाच्या अवशेषांमध्ये या शौचकुपाचा शोध लागला. मध्य चीनमधील शांक्सी प्रांताची राजधानी असलेल्या झियान येथे हे प्राचीन अवशेष आहेत. इसवी सन पूर्व 475 ते इसवी सन पूर्व 221 या काळात चीनमध्ये वारींग राजवट होती. त्या काळातील उमरावांकडे अशा शौचकुपांची व्यवस्था होती. हान साम्राज्याचा पहिला सम्राट किनचा उदय होण्यापूर्वी तिथे अनेक लहान-मोठ्या राज्यांमध्ये लढाया होत असत. 2200 वर्षांपूर्वी किनचे साम्राज्य निर्माण झाले त्यावेळीच अशा कमोडचा वापर सुरू झाल्याचे मानले जाते. अर्थातच या 'फ्लश टॉयलेट'मध्ये आपोआपच 'फ्लश' होत नसे.
उमरावांचे नोकर-चाकर बाऊलमध्ये पाणी ओतून मैला पाईपमधून बाहेर ढकलत असत. चीनमध्ये सापडलेले हे आतापर्यंतचे पहिले प्राचीन 'फ्लश टॉयलेट' आहे. आधुनिक काळात इंग्लंडमध्ये सन 1596 मध्ये सर जॉन हॅरिंग्टन यांनी पहिल्या मॅन्युअल फ्लश टॉयलेटची निर्मिती केली असे मानले जाते. त्याने आधी स्वतःसाठी असे टॉयलेट निर्माण केले व नंतर महाराणी एलिझाबेथ पहिल्या यांच्यासाठी!

