चीनच्या सर्वात मोठ्या धबधब्याची पोलखोल!

चीनच्या सर्वात मोठ्या धबधब्याची पोलखोल!

बीजिंग : चीन आणि बनावटगिरी हे आता पर्यायवाची शब्द बनले आहेत. केवळ मोबाईल फोन किंवा अन्य वस्तूच नव्हे तर अनेक बाबतीत चीनी बनावटगिरी समोर येत असते. चीनने चक्क धबधब्याबाबतही असा प्रकार केला असेल याची कल्पना खुद्द चीनी पर्यटकांनीही केलेली नव्हती. आता चीनमधील सर्वात उंच धबधब्याची पोलखोल झाली असून, या धबधब्यामध्ये नैसर्गिक नव्हे तर पाईपमधून सोडलेले पाणी कोसळत असल्याचे दिसून आले आहे!

चीनच्या हेनान प्रांतात हा प्रसिद्ध 'युंताई वॉटरफॉल' आहे. पर्यटकांमध्ये हा धबधबा अत्यंत लोकप्रिय आहे. उंच कड्यांवरून कोसळत असलेला हा धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी येत असतात. आता 'टिकटॉक'चे चीनी व्हर्जन असलेल्या 'डाऊयीन'वर एका टुरिस्टने या धबधब्याची असलियत समोर आणली आहे. त्याने दाखवले आहे की, युंताई माऊंटन सीनिक एरियातील या धबधब्याचे पाणी एका मोठ्या पाईपमधून येत आहे. 314 मीटर उंचीच्या या धबधब्याचे पाणी नैसर्गिकपणे येत नसल्याचे या व्हिडीओमधून दिसते. हा व्हिडीओ आता चीनी सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

लोकांनी त्यावर अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिल्याने युंताई माऊंटन पार्कचे प्रशासन नरमले. त्यांनी ही आपली चूक असल्याचे कबूल केले; पण पर्यटनासाठी हा आटापिटा केल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस कमी झाल्याने धबधब्यात पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे हा 'एक्स्ट्रा बूस्ट' द्यावा लागल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. काही दिवसांनी हा धबधबा नैसर्गिकरित्याच पूर्ण क्षमतेने कोसळू लागेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मात्र, या फसवेगिरीने पर्यटक नाराज झाले आहेत. चीन नेहमीच 'आशियातील सर्वात उंच धबधबा' अशी या धबधब्याची जाहिरात करीत असतो. 2023 मध्ये 70 लाखांहून अधिक पर्यटक याठिकाणी आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news