

रायपूर : मोबाईल, लॅपटॉप चार्ज करणे ही अनेकांना कटकटीची बाब वाटते. त्यामध्ये बराच वेळही जात असतो. बर्याचदा घाईघाईत निघतो आणि आपल्या मोबाईल, लॅपटॉपची बॅटरीही लो असते. त्यामुळे मध्येच ते बंद पडतात. पण आता काळजी करायची गरज नाही. कारण चार्जिंग नसलं तरी बाहेर चालता चालताच तुम्ही तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही चार्ज करू शकता. काय, आश्चर्य वाटलं ना? हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
छत्तीसगडमधील तीन विद्यार्थिनींनी ही कमाल केली आहे. अकरावीच्या या विद्यार्थिनींनी असे हायटेक शूज तयार केले आहेत, ज्यामुळे तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज होईल. हे शूज तुमचं लोकेशन ट्रॅग करू शकतील. पिथौरातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील या तीन विद्यार्थिनी आहेत. तिघींनी संस्कार शिक्षण संस्थानच्या मदतीने हे खास शूज तयार केले आहेत. संस्थेतील तरुण वैज्ञानिक गौरव चंद्राकार म्हणाले, हे हायटेक शूज घालून पायी चालताना मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करता येईल.
या शूजमध्ये अशी सिस्टम बसवण्यात आली आहे की, धोक्याच्यावेळी हाय व्होल्टेज झटका देऊन बचावही करेल. यामध्ये जीपीआरएस सिस्टमही आहे. म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत हे शूज पोलिस आणि कुटुंबातील सदस्यांना मेसेजही पाठवेल. मेघा सिन्हा, अलिफा भोई आणि प्रीती चौहान असं या विद्यार्थिनींचं नाव आहे. हे शूज जवान आणि महिलांच्या सुरक्षेत मदतशीर ठरतील, अशी माहिती त्यांनी दिली.