नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी एका झोपलेल्या महिलेच्या पायाला विळखा घालून नाग बसला होता व अशा स्थितीत ती महिला दोन तास धीर धरून शांत बसली होती, असे वृत्त आले होते. पावसाळ्यात अनेक सर्प घरातही येत असतात व ते कुठे लपतील हे काही सांगता येत नाही. आता एका घरात चक्क बुटात ठाण मांडून बसलेल्या एका नागाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
यू ट्यूबवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला व तो लगेचच व्हायरलही झाला. यामध्ये एक सर्पमित्र एका घरात जातो व तिथे बुटात लपलेला नाग पकडतो असे दिसते. बुटामधून हा नाग लपून छपून बाहेर पाहत बसलेला होता. त्याला आपल्या अवजाराने डिवचून हा सर्पमित्र बाहेर काढतो. हा नाग फणा काढून वळवळत बाहेर येतो आणि खोलीच्या कोपर्यात घुटमळू लागतो.
त्यावेळी त्याच्या शेपटीला धरून व सुरक्षेच्या साधनाद्वारे हा सर्पमित्र त्याला बाहेर घेऊन येतो व सुरक्षितस्थळी सोडून देतो. बुटामध्ये विंचू किंवा विषारी किडे लपून बसलेले असू शकतात. त्यामुळे कपडे किंवा बूट परिधान करीत असताना सावधगिरी बाळगणे हितावह ठरते. आता तर या व्हिडीओमधून दिसते की कशा प्रकारे एक नागही बुटात बसलेला असू शकतो!