

वॉशिंग्टन : काही कंपन्या आपल्या उत्पादनाचा दर्जा तपासण्यासाठी तसेच लोकांना ही उत्पादने आवडतील की नाही हे तपासण्यासाठी काही लोकांना 'टेस्टिंग'साठी नेमतात. चॉकलेटपासून मद्यापर्यंतची चव घेऊन त्यांचा दर्जा सांगणार्या नोकर्या अनेक आहेत. इतकेच नव्हे तर गादीवर झोपून तिचा दर्जाही कसा आहे हे पाहण्यासाठी चक्क डाराडूर झोपण्याचेही पैसे दिले जात असतात. आता अशीच एक नोकरी चर्चेत आली आहे. ही नोकरी आहे पिझ्झा खाण्याची!
मॅडिसन, विस्कॉन्सिन येथील डेअरी रिसर्च सेंटरने अलीकडेच नवीन संशोधक पदाची घोषणा केली आहे. यामध्ये आठवडाभर चीज, पिझ्झा आणि इतर पदार्थांचे टेस्टिंग करणे आवश्यक आहे. 'डिस्क्रिप्टिव्ह सेन्सरी पॅनेलिस्ट' या पदावर ही भरती केली जाणार आहे. कामाच्या प्रत्येक एका तासासाठी उमेदवाराला चांगली रक्कम दिली जाईल. येथे होणार्या पॅनेल चर्चा, प्रशिक्षण सत्र आणि इतर कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी व्हावे लागेल. यासाठी निवड झालेल्या उमेदवाराला प्रतितास 15 डॉलर्स दिले जाणार आहेत. 'डेअरी रिसर्च सेंटर' सर्व प्रकारचे पदार्थ, परंतु विशेषतः चीज, पिझ्झा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची आवड असलेल्या व्यक्तीच्या शोधात आहे. या ठिकाणी नोकरीस रूजू झाल्यावर, संशोधन आणि उत्पादन विकासासाठी काम करणे, यासोबतच पदार्थाची पोत, चव आणि सुगंध वैशिष्ट्ये ओळखून त्यावर चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे याविषयाचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञ परीक्षकांच्या गटाचा भाग व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे सांगण्यात आले. पॅनेलच्या सदस्यांना इतर पदार्थांसोबतच 24 पनीरचे नमुने आणि 12 पिझ्झाची चव चाखावी लागणार आहे. पिझ्झा आणि इतर वस्तूंचे नमुने घेणे हा कामाचा एक मोठा भाग असला तरी काही अतिरिक्त काम करावे लागणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह सेन्सरी पॅनेलिस्ट म्हणून निवडलेल्या उमेदवारांना खाद्य उत्पादनांच्या मोठ्या श्रेणीचे वर्णन करणे, पॅनेल चर्चेत भाग घेणे, प्रशिक्षण चर्चांमध्ये भाग घेणे अशा बर्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत.