चंद्रावरील पर्वताला गणितज्ज्ञ महिलेचे नाव

चंद्रावरील पर्वताला गणितज्ज्ञ महिलेचे नाव

न्यूयॉर्क : 'द इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियन' (आयएयू) ने चंद्रावरील 20 हजार फूट म्हणजेच 6 हजार मीटर उंचीच्या एका पर्वताला अमेरिकन गणितज्ज्ञ मेल्बा रॉय मौटन यांचे नाव दिले आहे. मौटन यांनी 'नासा'मध्ये 14 वर्षे सेवा बजावली होती. 'अपोलो 11'ने 20 जुलै 1969 मध्ये चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर त्यांना 'अपोलो अ‍ॅचिव्हमेंट' पुरस्कारही देण्यात आला होता.

वॉशिंग्टनमधील नासाच्या मुख्यालयातील सँड्रा कॉनेली यांनी सांगितले की मेल्बा मौटन या 'नासा'मधील नवी दिशा दाखवणार्‍या व्यक्तींपैकी एक होत्या. त्यांनी अंतराळातील रहस्ये उलगडण्यात 'नासा'ला मदत तर केलीच, शिवाय या क्षेत्रात महिला व कोणत्याही वर्णाच्या व्यक्तीला येण्यासाठी मार्गही खुला केला. त्यांनी 1959 मध्ये 'नासा'मध्ये प्रवेश केला. मेरीलँडमधील गॉडर्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये त्या हेड मॅथेमॅटिशियन म्हणून रूजू झाल्या होत्या. 'इको1' आणि 'इको2' या सॅटेलाईट्सना ट्रॅक करणार्‍या टीममध्ये त्या समाविष्ट होत्या. हे सॅटेलाईट्स अनुक्रमे 1960 आणि 64 मध्ये पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले होते.

1961 मध्ये त्या 'मिशन अँड ट्रॅजेक्टरी अ‍ॅनालिसिस डिव्हिजन'मध्ये हेड प्रोग्रॅमर म्हणून रूजू झाल्या. त्यांच्या 'प्रोग्रॅम सिस्टीम ब्रँच' या टीमनेच नासाच्या यानांना पृथ्वीच्या कक्षेत ट्रॅक करण्यासाठीच्या कॉम्प्युटर प्रोग्रॅम्सचे कोडिंग केले होते. 1973 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी त्या ट्रॅजेक्टरी अँड जियोडायनॅमिक्स डिव्हिजनच्या रिसर्च प्रोग्रॅम्सच्या असिस्टंट चीफ बनल्या होत्या. 1990 मध्ये वयाच्या 61 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या पर्वताला 'मोन्स मौटन' असे नाव देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news