चंद्राच्या ध्रुवीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फ

चंद्राच्या ध्रुवीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फ

बंगळूर : भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांनी चंद्राबाबत एक नवे संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चंद्राच्या ध्रुवीय भागातील विवरांमध्ये आधीच्या अनुमानाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पाण्याचा बर्फ आहे. 'इस्रो'ने म्हटले आहे की 'आयएसपीआरएस जर्नल ऑफ फोटोग्रामेट्री अँड रिमोट सेंसिंग'मध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संशोधनानुसार चंद्राच्या पृष्ठभागापासून काही मीटर खोलीवर बर्फाचे प्रमाण पृष्ठभागाच्या तुलनेत पाच ते आठ पट अधिक आहे. हा दबलेला बर्फ चंद्रावर दीर्घकाळापर्यंत मानवाला राहण्यासाठी उपयूक्त ठरू शकतो.

इस्रो स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (एसएसी) मधील टी. चक्रवर्ती यांनी सांगितले की, या बर्फाचे वितरण आणि खोली यांची अचूक माहिती भविष्यात या चंद्रावरील बाष्पशील पदार्थांचा छडा लावण्यासाठी आणि नमुने गोळा करण्यासाठी लँडिंग स्थळांची निवड करीत असताना महत्वाची ठरेल. 'नासा'च्या 'एलआरओ' या ऑर्बिटरवर सात उपकरणे असून त्यांच्याकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. त्यामध्ये टीमला आढळले की, चंद्राच्या उत्तर ध्रुवीय क्षेत्रात दक्षिण ध्रुवाच्या तुलनेत सुमारे दुप्पटीने अधिक बर्फ आहे.

या बर्फाची उत्पत्ती प्राचीन काळातील चंद्रावरील ज्वालामुखींमधून निघालेल्या वायूंमुळे झाली आहे. भारताच्या 'चांद्रयान-2' ऑर्बिटरच्या रडार डेटाचा वापर करून काढलेले निष्कर्ष असे संकेत देतात की काी ध्रुवीय विवरांमध्ये बर्फ असू शकतो. पाणी हा मानवी जीवनासाठी अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व भविष्यातील मानवी योजनांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news