न्यूयॉर्क : नॉर्वे किंवा स्वीडनसारख्या देशांमध्ये आकाशात नॉर्दन लाईट्स किंवा 'ऑरोरा' या नावाने ओळखला जाणारा रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा खेळ पाहायला मिळत असतो. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला सौरकण धडकले की असा 'ऑरोरा' निर्माण होतो.
आपल्या सौरमालिकेतील सर्वात मोठा ग्रह गुरूवरही असे ध्रुवीय प्रकाशझोत किंवा ऑरोरा पाहायला मिळतात. त्याचे रहस्य आता संशोधकांनी उलगडले आहे.
'नासा'ने गुरूवरील ऑरोराबाबत संशोधन केले आहे. गुरूच्या दोन्ही ध्रुवांवर असे ऑरोरा पाहायला मिळतात. मात्र, हे ऑरोरा चक्क एक्स-रे उत्सर्जित करतात! अशी किरणे उत्सर्जित होण्यामागील कारणांचा गेल्या 40 वर्षांपासून अभ्यास सुरू होता.
आता हे कोडे उलगडण्यात यश आले आहे. 'नासा'ने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये गुरूचे सौंदर्य दिसून येतेच, शिवाय त्याच्या दोन्ही ध्रुवांवरील जांभळट रंगाचा ऑरोराही दिसून येतो.
या ग्रहाच्या वातावरणात आयन धडकल्याने ऑरोरा बनतात. एक्स-रेच्या माध्यमातून हे आयन ग्रहाच्या वातावरणात येत असतात. आकाराने अतिशय मोठा असल्यामुळे गुरूवरील ऑरोरा अतिशय शक्तिशाली असतात.
ज्यावेळी ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जोरदार कंपने होतात त्यावेळी त्यामधून एक्स-रे बाहेर पडतात. या कंपनांमुळे आयन गुरूच्या चुंबकीय क्षेत्रापर्यंत जातात आणि तेथे ऊर्जा उत्सर्जित करतात. यामुळेच ग्रहाच्या दोन्ही ध्रुवांवर रंगीबेरंगी ऑरोरा दिसून येतो.